SRA Project Pune | पुण्यातील एसआरएचे प्रकल्प रखडले | आमदार हेमंत रासनेंची विधानसभेत आक्रमक भूमिका
कसबा पेठेतील प्रकल्पग्रस्तांवार अन्याय होऊ देणार नाही – शंभूराज देसाई
MLA Hemant Rasane – (The Karbhari News Service) – कसबा पेठ १२७८ येथील एसआरए प्रकल्प गेली पंधरा वर्षांपासून रखडलेला आहे. प्रकल्पग्रस्तांना हटवून ३ क, ३ ड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वक्फ बोर्डाने जागेवर हक्क सांगितल्याने हा प्रकल्प अडचणीत आला, त्यामुळे स्थानिक नागरिकांची हेळसांड होत असून गेल्या ५० महिन्यांपासून त्यांना घरभाडेही मिळाले नसल्याची लक्षवेधी सूचना आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत मांडली. यावेळी पुणे शहरात रखडलेल्या एसआरए प्रकल्पांच्या मुद्दा देखील त्यांनी मांडला.
पुणे शहरातील एसआरएच्या ५४० पैकी फक्त ४० झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे. उर्वरित झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन रखडण्याचे प्रमुख कारण म्हणजे एसआरएचे योजनांकडे होणारे दुर्लक्ष आहे. प्रकल्पा संदर्भात निर्माण होणारे वाद सोडवण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची गरज आहे. झोपडपट्टी पुनर्विकास करताना स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांसाठी राहण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने शहरात किमान १०,००० ते २०,००० ट्रान्झिट कॅम्प उभारण्याची गरज असल्याची सूचना यावेळी हेमंत रासने मांडली.
लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी स्थानिक रहिवाशांवर कोणताही अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली आहे. “कसबा पेठेतील पुणेश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्था ही वक्फ बोर्डाची जागा असल्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणाने दिला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात स्थानिक रहिवाशांनी न्यायालयात अपील दाखल केले असून त्यानुसार जैसे थे प्रकरण ठेवण्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांवर कोणताही अन्याय होणार नाही याची शासनातर्फे पूर्ण दखल घेतली जाईल, असे आश्वासन
देसाई यांनी दिले आहे.
——–
कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये शहरातील प्रमुख बाजारपेठा असल्याने हजारो नागरिक दररोज येथे येत असतात. शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता तसेच कुमठेकर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. परंतु प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आयुक्तांना निर्देश देऊन ही अतिक्रमणे लवकरात लवकर हटवण्याची मागणी देखील आमदार हेमंत रासने यांनी विधिमंडळ सभागृहात केली आहे.
COMMENTS