कचरा गाड्यावरून महापालिका प्रशासन धारेवर
: नगरसेवकांनी मुख्य सभेत केली पोलखोल
पुणे – शहर स्वच्छतेमध्ये (City Cleaning) देशात पुण्याचा (Pune) पाचवा क्रमांक आला असला तरी कचरा उचलण्यासाठी गाड्या मिळत नसल्याने शहरातील कचऱ्याचा (Garbage) प्रश्न गंभीर झाला आहे. शहरात सर्वकाही उत्तम असल्याचा दिखावा प्रशासनाकडून केला जात असला तरी त्याची सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पोलखोल केली.
मोटार वाहन विभागातर्फे विविध कामांसाठी पाच कोटी रुपयांचे वर्गीकरण उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या मुख्य सभेत आज ठेवण्यात आला. त्यावेळी नगरसेवकांनी कचऱ्याचा प्रश्न उपस्थित केला. शहरात कचरा उचलणाऱ्या गाड्या चार ते पाच महिन्यांपासून बंद आहेत, त्यामुळे कचरा प्रश्न गंभीर झाला आहे. मोटार वाहन विभागातर्फे गाड्या भाडे तत्त्वावर घेणे सुटे भाग घेणे, आरटीओचे काम करून घेणे यासाठी पाच कोटी रुपयांचे वर्गीकरण उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत ठेवण्यात आला होता. त्यावेळी नगरसेवकांनी या गाड्यांची नादुरूस्ती, अपुऱ्या गाड्यांविषयी चर्चा केली. नादुरुस्त गाड्यांचे स्पेअर पार्ट परदेशातून येतात का? असा प्रश्न यावेळी नगरसेवकांनी उपस्थित केला.
याबाबत नगरसेविका प्रिया गदादे-पाटील म्हणाल्या, भाडे तत्त्वावर गाड्या घेतल्या जातात, पण सतत या गाड्या खराब होतात. दिलीप वेडे पाटील म्हणाले, आमच्या भागातील गाडी तीन महिने गॅरेजला आहे. स्पेअर पार्ट परदेशातून आणायचे आहेत का? समाविष्ट गावांमुळे प्रभाग मोठा झाला त्यामुळे तेथे कचरा संकलनासाठी गाडी आवश्यक आहे. यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांनी ३०० गाड्या कमी आहेत, गाड्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, असा खुलासा केला.
राडारोडा उचलणाऱ्या गाड्या अतिशय भंगार अवस्थेतील आहेत. फोन केले तरी गाड्या उपलब्ध नाही असे उत्तर दिले जाते. जेटींग मशिनला मागणी आहे. त्यामुळे डिझेल जास्त लागत असल्याचे योगेश ससाणे यांनी सांगितले.
तीनशे गाड्यांची गरज आहे, याची निविदा ७ वर्षासाठी काढली जाणार आहे. अतिरिक्त गाड्या सध्याच्या ठेकेदाराकडून मागवून घेऊ. नवीन गावात देखील गाड्या पुरविल्या जातील.
- विक्रम कुमार, आयुक्त महापालिका
COMMENTS