Medical Education Exam | ‘वैद्यकीय शिक्षण’च्या परीक्षा पुढे ढकलल्या | मुसळधार पावसाचा फटका
Madhuri Misal – (The Karbhari News Service) – राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय व दंत महाविद्यालय तसेच संलग्नित रुग्णालयांमधील गट-क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सुरू असलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिला आहे. (Maharashtra News)
राज्यातील अनेक भागांत मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या अती मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, या आपत्कालीन परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे पावसामुळे जिकिरीचे व अडचणीचे ठरले होते. या अनुषंगाने सर्व परीक्षार्थीचे पुढील होणारे नुकसान टाळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मिसाळ यांनी तत्काळ परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश दिले.
वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्तालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, २५ व २६ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
या संदर्भातील सुधारीत वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर अद्ययावत माहिती तपासत राहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS