Mahavikas Aghadi With MNS | महापालिका आयुक्त बंगला प्रकरणा वरून मनसे च्या मदतीला धावली महाविकास आघाडी!
| महाविकास आघाडीचे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन
Pune Politics News – (The Karbhari News Service) – राज्यात मनसे आणि शिवसेना (UBT) यांच्या मनोमिलन ची जोरदार चर्चा आहे. अशातच आता महाविकास आघाडी देखील मनसे ला आपल्या आघाडीत समाविष्ट करून घेण्यास उत्सुक असल्याची दिसून येत आहे. याची एक झलक पुण्यात पाहायला मिळाली. महापालिका आयुक्त आणि मनसे यांच्यात आयुक्त बंगल्यातील सामग्री वरून शाब्दिक चकमक झाली होती. यात महापालिकेने आक्रमक भूमिका घेत मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आता यात महाविकास आघाडीने उडी घेतली आहे. एक प्रकारे आघाडी मनसेच्या मदतीला धावून आली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे,
महानगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष व शिवसेनेसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. (Pune Municipal Corporation -PMC)
महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदना नुसार दोन महिन्यांपूर्वी निवृत्त झालेले पुणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त यांच्याकडे पुणे शहराच्या देखभालीची जबाबदारी असताना त्यांनी त्यांचा कार्यकाळ अनावश्यक टेंडर काढून पैसे कमावण्यात घालवला. तो पैसाही कमी पडला की काय, म्हणून जाता जाता त्यांनी महानगरपालिका आयुक्तांच्या शासकीय बंगल्यातील लाखोंचे सामान ही चोरी करून नेले. दुर्दैव म्हणजे माजी आयुक्तांची ही चोरी लपवण्यासाठी संपूर्ण महानगरपालिका प्रशासन हिरीरीने कामाला लागले. आयुक्तांनी बंगल्यातून चोरून नेलेले डायनिंग टेबल, पितळी भांडी व इतर मौल्यवान सामान पुन्हा विकत घेण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने टेंडर काढले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना काल महानगरपालिका प्रशासनाने अतिशय अपमानास्पद वागणूक दिली.

माजी आयुक्तांनी आयुक्त बंगल्यातील कमोड, वॉश बेसिन व पाण्याचे नळ सोडून उर्वरित सर्व सामान लंपास केले. म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने पुणे महानगरपालिकेला नवीन कमोड, वॉश बेसिन व नळ भेट देण्यात आले. हे सामान महानगरपालिका प्रशासनाने चोरी करणाऱ्या माजी आयुक्तांना पाठवून द्यावे असे महाविकास आघाडीकडून प्रशासनाला उपरोधिकपणे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप त्यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय मोरे व गजानन थरकुडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ बाबर यांच्यासह या चारही पक्षांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात प्रचंड संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS