वाहतुक दंडवसुली बाबत नितीन गडकरींशी बोलू
: पोलिसांच्या दंडवसुलीला चंद्रकांत पाटील यांचा विरोध
पुणे : वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाते. मागील तीन वर्षांपासून सीसीटीव्हीद्वारे प्रामुख्याने ही कारवाई केली जात आहे. नियम मोडलेल्यांना घरपोच तसेच मोबाईलवर याची माहिती कळवली जाते. हा दंड न भरल्यास वाहतूक शाखेकडून नाकाबंदी आयोजित केली जाते आणि त्याद्वारे वाहनांची तपासणी करून दंड वसूल केला जातो. याच दंडात्मक कारवाईला पुणेकर सध्या वैतागले आहेत. कारण शहरात ठिकठिकाणी वाहतूक पोलीस वाहने अडवून दंड वसूल करताना दिसत आहे.
वाहतूक पोलिसांच्या या दंडवसुली बाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant patil) यांना विचारले असता ते म्हणाले, ही जी हुकूमशाही सुरू आहे, जुलूम सुरू आहे त्याला भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे. याचा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी नजीकच्या काळात रस्त्यावर उतरणार आहे. हेल्मेट वापरणं हे जिवीतच्या दृष्टीने आवश्यक आहे म्हणता परंतु दुसरीकडे त्याच्यावर एवढे जास्त दंड लावता हे त्या माणसाच्या जिवापेक्षाही भयंकर आहे. प्रबोधन करून, समजावून किंवा ताकीद देऊनही यावर मार्ग काढता येऊ शकतो. परंतु जास्तीचा फाईन आकारणे हे त्या माणसाच्या जिवापेक्षाही भयंकर आहे.
नितीन गडकरींच्या खात्याने हे दंड लावणे सुरू केले असल्यास त्यांना भेटून इतक्या मोठ्या प्रमाणात दंड आकारणे अन्यायकारक आहे हे आम्ही त्यांना सांगू. आपल्या एखाद्या नेत्याने अपुर्या माहितीच्या आधारे, परिणाम काय होतील याचा विचार न करता एखादा निर्णय घेतला असेल तर भारतीय जनता पार्टी त्यांनी त्या नेत्याला सुद्धा प्रेमाने निवेदन देऊन समजते. या विषयावर आम्ही नितीन गडकरींशी देखील बोलू, असं पाटील म्हणाले.
COMMENTS