IT Park Pune | आय.टी पार्कची पावसाने झालेली दुर्दशा | भाजप सरकारसाठी लाजीरवाणी – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका
Mohan Joshi Pune – (The Karbhari News Service) – पहिल्याच पावसात आय.टी पार्क असलेल्या हिंजवडी येथे रस्ते जलमय होऊन उडालेली दैना महाराष्ट्रातील भाजप सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे. (Pune News)
आय.टी पार्क क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणे, त्यांना मुलभूत नागरी सुविधा पुरविणे, यासाठी प्राधान्य देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. पण त्यात संपूर्णपणे कुचराई होत आहे. या कारणारे अनेक उद्योग पुण्यातून बाहेर जात आहेत. आय.टी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना पुण्यात वास्तव्य करणे अवघड झाले आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी बाहेरून आणावे लागत आहे, अशा तक्रारी ऐकू येतात. महायुती सरकारचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेजण आश्वासने देण्यापलीकडे कोणतेही भरीव काम करू शकलेले नाहीत, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कोरोना साथीच्या काळात २१साली पुणे शहरात दहा दिवसांसाठी दुसऱ्यांदा निर्बंध लागू केले होते. तेव्हा विद्यापीठ रस्त्यावरील उड्डाणपूल पाडण्यात आला. तिथे दुसरा उड्डाणपूल तातडीने उभा करण्यात पालकमंत्र्यांना साफ अपयश आले. औंध, पाषाण, बाणेर, बालेवाडी या भागातील रहिवाशांची वाहतुकीसाठी गैरसोय झाली. प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. परंतु, भाजप सरकारला त्याची फिकीर वाटली नाही. शिवाजीनगर -हिंजवडी मेट्रोचे काम संथ गतीने चालू आहे. प्रत्यक्ष कामाऐवजी भूमीपूजन आणि एकाच प्रकल्पाची वारंवार उदघाटने करणे यातच भाजपचे नेते रमले आहेत, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्याचे धोरण माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांनी आखले. त्यातूनच हैदराबाद, पुणे बंगळूर येथे आय.टी पार्क विकसित झाले. हिंजवडीतील प्रकल्पाला उत्तेजन देऊन अधिकाधिक उद्योजक पुण्याकडे यावेत याकरीता ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्य मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी अथक प्रयत्न केले. पुणे महापालिकेत काँग्रेसचे बहुमत असताना आय.टी क्षेत्राला वाव देण्यासाठी अनेक सवलती देऊ केल्या होत्या. २०१४ साल नंतर केंद्रात आणि राज्यात भाजप चे सरकार आल्यावर पुण्यातील आय.टी क्षेत्राला गती मिळण्याऐवजी ब्रेक लागला, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.
COMMENTS