मराठी साहित्यातील ‘मिरासदारी’ हरवली!
विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचे निधन
: महाराष्ट्राला हसवण्याचे काम
प्राध्यापक द मा मिरासदार यांचे निधन वृत्त समजले अतिशय दुःख झाले. मराठीतील एक अतिशय नामवंत लेखक, मराठीचे प्राध्यापक, कथाकथनकार म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती.शंकर खंडू पाटील, व्यंकटेश माडगूळकर आणि मिरासदार सर यांचे कथा कथनकाचे कार्यक्रम अनेक वेळा पाहण्याचा योग आला त्यातील मजा ही काही औरच होती. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली मी बरीच पुस्तके वाचली भोकरवाडीच्या गोष्टी, फुकट, बेंडबाजा, मिरासदारी, भुताचा जन्म, माझ्या बापाची पेंड, अशा अनेक पुस्तकांचा समावेश करावा लागेल. 14 एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिवशी 1927 साली त्यांचा जन्म झाला आज 94 व्या वर्षी ते आपल्याला सोडून गेले. गेली अनेक वर्ष ते सार्वजनिक जीवनात दिसले नाहीत. प्राध्यापक मिरासदार सरांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली !
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
प्राध्यापक द मा मिरासदार सरांचं निधन वृत्त मनाला चटका लाउन जाणारं आहे. गरवारे कॉमर्स कॉलेजमध्ये असताना पीडी,एफवाय मध्ये सर आम्हाला शिकवायला होते. त्यांच्या वर्गात बसणं हे आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाचं असायचे, इतर प्राध्यापकांच्या तासाला आम्ही फारसे कधी बसत नव्हतो पण सरांचा तास आम्ही कधी चुकवत नव्हतो. गेली काही वर्षे ते आजारी होते पण त्यापूर्वी आम्ही आमचा मित्र आनंत वाघ यांच्या पुढाकाराने कॉलेजमधील काही मित्र मैत्रिणीनी एकत्र येऊन मी महापौर झाल्यावर सरांच्या हस्ते माझा सत्कार केला तो माझ्या कायम स्मरणात राहील. अनंत वाघ ह्याच्या पुढाकाराने सरांना आम्ही काही मित्रा बरोबर स्नेहभोजन करीत असु त्यानंतर सरांचा गप्पांचा फड रंगत असे, आता ते होणे नाही. सरांना माझी आदरपूर्वक श्रद्धांजली.
अंकुश काकडे, माजी महापौर, पुणे
ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी त्यांच्या लेखनाची सुरुवात पत्रकारितेच्या माध्यमातून केली. पत्रकारिता क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी प्रदीर्घकाळ अध्यापनाचे काम केले. विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ख्याती होती. सामान्य वाचकांबरोबरच जाणकार समिक्षकांनी सुध्दा त्यांच्या लेखनाला दाद दिली. अस्सल ग्रामीण ढंगाच्या माध्यमातून द. मा. मिरासदार यांनी कथाकथनाची आपली वेगळी शैली विकसित केली. मराठी कथाकथन प्रकाराला लोकप्रियता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या निधानाने प्रतिभावान साहित्यिक, कथाकथनकार हरपला आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.
अजित पवार, उपमुख्यमंत्री.
ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार आणि मराठीचे प्राध्यापक द.मा. मिरासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! ‘दमां’च्या जाण्यानं मराठी साहित्याचं मोठं नुकसान झालंय. उत्कृष्ट लिखाण आणि उत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात त्यांच्या कथा कायमच्या कोरल्या गेल्या.ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद ‘दमां’नी आपल्या कथांतून तर फुलवलेच, शिवाय काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले. विनोदालाही कारुण्याची झालर असल्याचं त्यांच्या कथांमधूनही अनुभवायला मिळायचं. आपल्या सर्वांच्या मनावर लेखणीच्या माध्यमातून अधिराज्य गाजवणाऱ्या ‘दमां’च्या स्मृती पुणे महापालिकेच्या माध्यमातून नक्कीच यथोचित जतन केल्या जातील. ‘दमां’ना समस्त पुणेकरांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली !
COMMENTS