PMC Balantvida Yojana | गरोदर व स्तनदा मातांना मिळणार ‘बाळंतविडा’ पौष्टिक आहार किट; | ११ पदार्थांचा समावेश
| महिला व बालकल्याण समितीची मंजुरी
Pune PMC News – The Karbhari News Service – अल्प उत्पन्न गटातील पात्र गरोदर आणि स्तनदा मातांना पौष्टिक आहाराचे किट देणारी “पौष्टिक आहार (बाळंतविडा) योजना” महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने मंजूर केली आहे. योजना समाज विकास विभागामार्फत, आरोग्य विभागाच्या सहकार्याने राबवली जाईल. आयुक्त नवल किशोर राम यांनी अभिप्रायात या योजनेला तत्त्वतः सकारात्मक पाठिंबा दिला आहे. लाभार्थ्यांची संख्या, आवश्यक आर्थिक तरतूद आणि निधी यांचा विचार करून पुढील कार्यवाही करता येईल, अशी अट त्यांनी घातली आहे. (PMC Women and Child Welfare Commiittee)
योजना कशासाठी?
पालिका क्षेत्रातील अल्प उत्पन्न गटातील अनेक गरोदर व स्तनदा मातांना आवश्यक पोषण आहार मिळत नाही, त्यामुळे माता व बालकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, असे अभिप्रायात म्हटले आहे. निरोगी माता आणि सुदृढ बाळासाठी गर्भधारणेच्या काळात आणि प्रसूतीनंतर योग्य पोषण आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागाने आहाराचे घटक ठरवून पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असे सुचवले आहे.
महिला व बालकल्याण समितीने ४ ऑगस्ट २०२६ च्या ठराव क्र. १११ अन्वये ही योजना समाज विकास विभागामार्फत राबवण्याबाबत आयुक्तांचा अभिप्राय मागवला होता. आरोग्य विभागाचाही अभिप्राय घेतला गेला. स्तनदा मातांना अतिरिक्त पोषण देणे, प्रसूतीनंतरची शारीरिक झीज भरून काढणे, मातृ कुपोषण व अॅनिमिया कमी करणे आणि माता-बाल आरोग्य सुधारणे, हा योजनेचा उद्देश असल्याने आरोग्य विभागाने तिला तत्त्वतः सकारात्मक अभिप्राय दिला आहे.
किटमध्ये काय असेल?
गरोदर व स्तनदा मातांसाठीच्या बाळंतविडा किटमध्ये ११ पदार्थ प्रस्तावित आहेत. कंसात त्यांचे पोषणमूल्य दिले आहे :
खारीक (कार्बोहायड्रेट, तंतुमय पदार्थ, लोह)
खोबरे (स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ)
गूळ (कार्बोहायड्रेट, लोह)
फुटाणे डाळी (प्रथिने, तंतुमय पदार्थ, लोह)
शेंगदाणे (प्रथिने, आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ)
गावरान तूप (ऊर्जा देणारे स्निग्ध पदार्थ)
सुकामेवा, बदाम व काजू (प्रथिने, व्हिटॅमिन E, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे)
काळे बेदाणे/मनुका (कार्बोहायड्रेट, लोह)
कडधान्ये : मूग, मटकी, चवळी व हुलगे/कुळीथ (प्रथिने, तंतुमय पदार्थ, फोलेट, लोह)
सोया वडी/सोया ग्रॅन्यूल्स (उच्च दर्जाची वनस्पतीजन्य प्रथिने, लोह)
जवस (ओमेगा-३, तंतुमय पदार्थ)
लाभार्थी कोण?
लाभार्थी निवडताना पालिकेच्या दवाखान्यांमध्ये त्यांची प्रसूतीपूर्व (ANC) व प्रसूतीनंतरची (PNC) नोंदणी तपासली जाईल. उच्च जोखमीच्या माता, कमी BMI असलेल्या माता, अशक्तपणा असलेल्या माता (हिमोग्लोबिन ११ g/dl पेक्षा कमी) आणि कमी वजनाच्या माता यांना प्राधान्य देण्याचे सुचवले आहे.
किट हा आहाराला पर्याय नाही
किट हे पूरक पोषण आहे, नियमित संतुलित आहाराला पर्याय नाही, हे लाभार्थ्यांना समजावून सांगावे, असे अभिप्रायात नमूद आहे. त्यांना आयर्न-फॉलिक अॅसिड, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D सारखी पूरक औषधे नियमित घेणे आणि आवश्यक लसीकरण वेळेत पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल. स्तनपानाचे महत्त्व सांगून बाळाच्या जन्मानंतर पहिले सहा महिने केवळ स्तनपान करण्याबाबत समुपदेशन केले जाईल.
गुणवत्ता आणि वितरणाचे नियम
किटमधील सर्व अन्नपदार्थ FSSAI च्या सुरक्षा व गुणवत्ता मानकांनुसार असावेत.
प्रत्येक पदार्थाचा बॅच नंबर, उत्पादन तारीख आणि एक्स्पायरी तारीख नोंदवावी.
शेंगदाणे आणि खराब होण्याची शक्यता असलेले पदार्थ वितरणापूर्वी तपासावेत.
साठा स्वच्छ, कोरड्या, हवेशीर आणि कीटकमुक्त जागी ठेवावा. गरज असल्यास नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत.
वितरणाच्या वेळी प्रत्येक लाभार्थ्याची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा घ्यावा. पदार्थांचा वापर, पद्धत आणि साठवणूक याबाबत मार्गदर्शन करावे.
किट केवळ गरोदर व स्तनदा मातेच्या पोषणासाठी असल्याने कुटुंबातील इतरांनी ते वापरू नये, याबाबत समुपदेशन करावे.
देखरेख आणि मूल्यमापन
आरोग्य विभागाने लाभार्थी मातांचे हिमोग्लोबिन, वजन आणि BMI यांचे नियमित निरीक्षण करावे. PNC फॉलो-अपची स्थिती, स्तनदा माता केवळ स्तनपान करत आहेत का आणि कमी वजनाच्या नवजात बालकांचे प्रमाण याची माहिती संकलित करावी. दरवर्षी योजनेचे मूल्यमापन करावे, असेही म्हटले आहे. त्यात खालील गोष्टी तपासल्या जातील :
मातांमधील अॅनिमियाचे प्रमाण
स्तनदा मातांच्या वजनातील बदल
कमी वजनाच्या नवजात बालकांचे प्रमाण
केवळ स्तनपानाचा दर
लाभार्थ्यांचे समाधान
या मूल्यमापनाच्या आधारे अंमलबजावणीतील त्रुटी, आवश्यक सुधारणा आणि पुढील कार्यवाही ठरवली जाईल.
आयुक्तांचा अभिप्राय आणि पुढे काय?
आयुक्तांच्या अभिप्रायानुसार, पालिकेच्या दवाखान्यांमधील ANC/PNC लाभार्थ्यांची संख्या, त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद आणि योजनेसाठीचा निधी या बाबी विचारात घेऊन समाज विकास विभाग आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही योजना सुरू करण्याची कार्यवाही करेल. कागदपत्रांत किटची रक्कम, लाभार्थ्यांची एकूण संख्या आणि योजना कधी सुरू होणार, याचा उल्लेख नाही. प्रत्यक्ष सुरुवात आणि खर्चाबाबत प्रशासनाकडून अधिक माहिती अपेक्षित आहे.

COMMENTS