Hawkers Biometric Survey | पथारी विक्रेत्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याची मागणी
Hawkers Biometri Survey – (The Karbhari News Service) – प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत ‘स्वनिधी से समृध्दी’ (विस्तारीत टप्पा ५) कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation – PMC) पथारी विक्रेत्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करावे. तसेच हे सर्वेक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवावी,अशी मागणी जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाचे वतीने पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
या मागणीचे पत्र आज(२१ जून २०२४)रोजी आयुक्त कार्यालयात देण्यात आले.अध्यक्ष संजय आल्हाट,सरचिटणीस रणजीत सोनवळे,रोहित जसवंते,उपाध्यक्ष बंडू वाघमारे यांनी पत्रकाद्वारे या संबंधी माहिती दिली.
पथ विक्रेता राष्ट्रीय धोरण अस्तित्वात आल्यावर पुणे पालिकेने दहा वर्ष अंमलबजावणी केलेली नाही.गेली दहा वर्ष पथविक्रेता योजनेच्या कुटुंबियांचे सर्वेक्षण प्रलंबित आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा पथ विक्रेत्यांना लाभ मिळवून देणेकामी व जोपर्यंत पथारी विक्रेत्यांचे बायोमॅट्रिक सर्वेक्षण २०२४ पर्यंत होत नाही तोपर्यंत पथारी विक्रेत्यावरील कारवाई थांबवावी, असे पत्र यासंदर्भात जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाने २६ फेब्रुवारी २०२४ रोजीदिले होते.त्यावर आयुक्तांकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही ,दुसरीकडे पथारी विक्रेत्यांवर अन्यायकारक कारवाई केली जात आहे. पथारी विक्रेत्यांना एकत्रितपणे या योजनेची माहिती देऊन मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. परंतू पालिका कर्मचारी करवाईच्या नावाखाली त्यांचा माल उचलून घेवून अवास्तव दंडाच्या रक्कमेची मागणी करतात.पैसे न दिल्यास माल घेवून निघून जात आहेत. हे प्रकार तात्काळ थांबवावे अन्यथा आयुक्त कार्यालयासमोर जनआदोलन करण्यात येईल,असा इशारा या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.