सत्ताधारी भाजपला सतावतेय सत्ता जाण्याची भीती!
: मुदत संपण्याच्या 2 वर्ष अगोदर नवीन करार करण्याची घाई
: कायदा पायदळी तुडवला जात असल्याची राष्ट्रवादीची टीका
पुणे: गरवारे शाळेसमोरील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मारक संयुक्त प्रकल्पाद्वारे विवेक व्यासपीठ या संस्थेस चालवण्यास देण्यात आले आहे. त्याची मुदत 2023 ला संपत आहे. मात्र ही मुदत संपण्याआधीच हे स्मारक त्याच संस्थेला 30 वर्ष कालावधीसाठी चालवण्यास द्यावे. असा प्रस्ताव शहर सुधारणा समितीत मंजूर करण्यात आला आहे. मात्र भाजपच्या या कार्यपद्धतीचा विरोधी पक्षाने खरपूस समाचार घेतला आहे. मुदत संपल्यानंतर नवीन प्रस्ताव (New proposal) मागवणे आवश्यक असताना भाजप कायदा पायदळी तुडवण्याचे काम करत आहे. कारण भाजपला ( BJP) सत्ता जाण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे असे प्रस्ताव मान्य केले जात आहेत. असा आरोप राष्ट्रवादीने (NCP) केला आहे.
: शहर सुधारणा समितीच्या खास सभेत मंजुरी
सोमवारी शहर सुधारणा समितीची खास सभा घेण्यात आली. यामध्ये नगरसेविका वर्षा तापकीर आणि सुनिता गलांडे यांनी प्रस्ताव दिला होता. त्यानुसार पुणे पेठ शिवजीनगर करोड वरील गरवारे शाळेसमोरील स्वात्यंत्रवीर वि.दा.सावरकर स्मारक हे स्वा.वि.दा.सावरकरांचे जीवनप्रसंगावरील प्रदर्शनाकरीता असणारे स्मारक ही मिळकत ३० वर्षे कालावधीसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर पुणे महानगरपालिका आणि विवेक व्यासपीठ यांच्या समवेत संयुक्त प्रकल्प राबविण्यात यावा. ही मिळकत यापूर्वी दि.२६/३/२०१८ ते २५/०३/२०२३ पर्यंत ०५ वर्षे कालावधीसाठी संयुक्त प्रकल्पाद्वारे सदर संस्थेस देण्यात आलेली आहे. तरी ही मिळकत (property) मुख्य सभेच्या दिनांकापासून पुढील ३० वर्षासाठी विवेक व्यासपीठ संस्थेस संयुक्त प्रकल्पासाठी देण्यात यावी. तसेच मा.मुख सभा ठराव क्र.१०९३,दि.२६/०३/२०१८ रोजीचा ठराव दुरूस्त करणेत यावा. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. मात्र करार संपण्या अगोदर दोन वर्षे अशा पद्धतीने नवीन करार करण्याची घाई का आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या अगोदर शुक्रवारी समितीची सभा झाली होती. त्यामध्ये देखील असाच एक प्रस्ताव मान्य करण्यात आला होता. त्यानुसार पुणे पेठ पर्वती स.नं.११३ फा.प्लॉट नं.५४०/५ टी.पी.एस. सिंहगड रोड येथील जागेवर बांधलेले वीर बाजी पासलकर स्मारक सांस्कृतिक विभाग, पुणे महानगरपालिका आणि स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमानाने ना नफा ना तोटा या तत्वावर३० वर्षे कालावधीसाठी संयुक्त प्रकल्प राबविणेसाठी देण्यात यावा. याची देखील मुदत संपण्यास अजून काही महिन्याचा कालावधी आहे. तरी देखील यास मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांनी यास विरोध केला होता. मात्र बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मान्य करून घेण्यात आला.
: मुख्य सभेचा ठराव शहर सुधारणा समिती दुरुस्त करू शकते का?
अशा पद्धतीने मुदत संपलेली नसताना आणि नवीन प्रस्ताव मागवणे आवश्यक असताना नवीन करार करण्याची घाई का केली जात आहे. असा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होत आहे. शिवाय मुख्य सभेने मान्य केलेल्या प्रस्तावात दुरुस्ती करण्याचा अधिकार शहर सुधारणा समितीस आहे का? याबाबत मात्र शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष काही सांगू शकले नाहीत. मात्र विरोधी पक्षांनी याचा चांगलाच समाचार घेतला आहे. आगामी 6 महिन्यावर मनपा निवडणूक आल्या आहेत. त्यामुळे आपण सत्तेत असू कि नसू अशी शंका भाजप ला आहे. त्यामुळे आपल्याच मर्जीतल्या लोकांना काम देण्यासाठी भाजप प्रयत्न करते आहे. असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
———
संबंधित संस्था चांगले काम करत आहेत. त्यामुळे पुढील कालावधीसाठी त्याच संस्थांना हे काम देण्याचे आम्ही ठरवले आहे. त्यामुळे समितीत हे प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत.आनंद रिठे, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती
—-
मुदत संपल्यानंतर नवीन प्रस्ताव मागवणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्याही संस्थेला काम द्या. असे सांगत आम्ही विरोध करत होतो. मात्र भाजप कायदा पायदळी तुडवण्याचे काम करत आहे. कारण भाजपला सत्ता जाण्याची भीती सतावत आहे. आगामी 6 महिन्यावर मनपा निवडणूक आल्या आहेत. त्यामुळे आपण सत्तेत असू कि नसू अशी शंका भाजप ला आहे. त्यामुळे आपल्याच मर्जीतल्या लोकांना काम देण्यासाठी भाजप प्रयत्न करते आहे.
COMMENTS