शेतकरी-कष्टकऱ्यांचे नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन
कोल्हापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे सोमवारी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती रविवारी अत्यंत गंभीर बनली होती. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यांची प्रकृती उपचारास फारसा प्रतिसाद देत नव्हती. अखेर उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती म्हणून प्रा. एन. डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. पण तिथे गेल्यावर त्यांना लागोपाठ दोनवेळा ब्रेन स्ट्रोक आल्याने बोलणे बंद झाले. डॉक्टर त्यांच्या उपचारावर बारकाईने लक्ष ठेवून होते. प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती ढासळत होती. गेल्या चार दिवसांपासून पासून त्यांची शुद्ध हरपली होती. त्यांची प्रकृती उपचारास फारसा प्रतिसाद देत नव्हती. अखेर उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.
एन. डी. पाटील यांनी गेल्या 70 वर्षांहून अधिक काळ शेतकरी, कष्टकरी जनतेच्या प्रश्नी आवाज उठवण्याचे काम केले आहे. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून राज्यावर शोककळा पसरली आहे. प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केलं. 15 जुलै 1929 रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता.
नारायण ज्ञानदेव पाटील असे त्यांचे पूर्ण नाव असून 15 जुलै 1929 ला सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले होते.
राजकीय कारकिर्द :
1948 : शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
1957 : मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
1960-66,1970-76,1976-82 अशी 18 वर्षं महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
1969- 1978, 1985 – 2010 : शे.का.प.चे सरचिटणीस
1978-1980 : सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
1985-1990 : महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
1999-2002 : निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य आणि सीमा चळवळीचे प्रमुख नेते
एन. डी. पाटील यांना मिळालेले सन्मान /पुरस्कार
भाई माधवराव बागल पुरस्कार : 1994
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड : डी. लीट. पदवी, 1999
राष्ट्रीय बियाणे महामंडळ (अध्यक्षपद ) भारत सरकार : 1998 – 2000
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ : डी.लीट.पदवी, 2000
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद : 2001
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : डी. लीट. पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
अध्यापन कार्य :
१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य :
शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य
प्रसिद्ध झालेले लेखन
समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२
कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२
शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३
वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६
महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७
शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०
शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने)
COMMENTS