Environment Day 2025 | “शहरी वन लागवड” अंतर्गत पुणे महापालिका करणार १ लाख झाडांची लागवड!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या (PMC) सहकार्याने NAREDCO पुणेने पुणे महापालिकेने सुचविलेल्या जमिनींवर संपूर्ण शहरात शहरी वनांची निर्मिती करण्याचे वचन दिले आहे. त्यानुसार महापालिका १ लाख झाडांची लागवड करणार आहे. त्यासाठी NAREDCO आणि मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना आणि क्रेडाई यांची मदत घेतली जाणार आहे. अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.
NAREDCO पुणे आणि त्याचे सदस्य राजस जैन (कुमार वर्ल्ड) यांनी बाणेर आणि कर्वे नगर येथे अशा प्रकारचे शहरी वन हाती घेतले. या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह पीएमसीचे वरिष्ठ अधिकारी राजेश बनकर आणि डॉ. अशोक घोरपडे आणि NAREDCO पुणेचे सदस्य असलेले प्रमुख विकसक आणि रिअल इस्टेट भागधारक उपस्थित होते.
या प्रसंगी आयुक्त नवल किशोर राम यांनी एनएआरईडीसीओ पुणेने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि म्हणाले, “पुणे नेहमीच पर्यावरणाबाबत जागरूक राहिले आहे आणि विकास निसर्गाशी सुसंगत असणे महत्वाचे आहे. अशा शहरी वनांमुळे शहराला राहणीमान निर्देशांक उंचावण्यास मदत होईल.”
या प्रसंगी प्रशांत वाघमारे म्हणाले, “शक्य असेल त्या सर्व ठिकाणी जास्तीत जास्त झाडे लावणे हे आमचे ध्येय आहे. सुरुवातीला आम्ही शहरात अनेक नाले ओळखले आहेत जे शहरी वन म्हणून विकसित केले जाऊ शकतात. हिरवे आणि शाश्वत पुणे हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे”
भरत अग्रवाल – अध्यक्ष NAREDCO पुणे म्हणाले, “आमचे ब्रीदवाक्य स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित पुणे हे प्रत्येक नरेडको सदस्याच्या हृदयाच्या जवळचे ध्येय आहे. ही शहरी वन शहराची भविष्यातील फुफ्फुसे असतील. आम्ही संपूर्ण शहरात २५००० झाडे लावण्याचेच नव्हे तर ५ वर्षांसाठी त्यांची देखभाल करण्याचेही वचन दिले आहे”
क्रेडाई-पुणे मेट्रोचे अध्यक्ष मनीष जैन म्हणाले, “क्रेडाई-पुणे मेट्रोमध्ये, आमचा असा विश्वास आहे की विकास आणि शाश्वतता एकत्र चालली पाहिजे. वृक्षारोपण हा उपक्रम केवळ २५,००० झाडे लावण्याबद्दल नाही; तर तो स्वच्छ, हिरवेगार पुण्यासाठी आशा निर्माण करण्याबद्दल आहे. पीएमसी आणि स्थानिक समुदायांसोबत जवळून काम करून, आम्ही दीर्घकालीन पर्यावरणीय परिणाम निर्माण करण्यासाठी आणि जबाबदार शहरी विकासासाठी एक बेंचमार्क स्थापित करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
—
COMMENTS