CM Devendra Fadnavis | जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

HomeBreaking News

CM Devendra Fadnavis | जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ganesh Kumar Mule May 10, 2025 4:39 PM

Warkari Lathi-charge आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध | विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिक्रिया
PMPML Bus | पालखी सोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’ कडून जादा बसेसचे नियोजन
Palkhi ceremony : जगद्गुरू तुकोबा महाराज अन् ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तारखा जाहीर 

CM Devendra Fadnavis | जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

Pune News – (The Karbhari News Service) – प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर, आमदार उमा खापरे, शंकर जगताप, बाबाजी काळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथ, ॲड. रोहणीताई पवार, पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे हे ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानाही असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, ज्ञानपीठ तयार करण्यासाठी ७०१ कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल. इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसह ३९ गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत जाईल. इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पुजनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.

ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर यांनी भागवत धर्म प्रचारासाठी केलेले कार्य लक्षात घेता यांना पद्म पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या रूपातील पांडुरंगाचे दर्शन करण्याची संधी मिळालायचे अशी भावना व्यक्त करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. त्यामुळे आपला विचार, संस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकला नाही. परकीय आक्रमणाच्यावेळी संत समाजात सुविचार रुजवत होते. त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू आहे.

जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे संतांचे कार्य

संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. संतांची ही मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे कार्य संतांनी केले. वारकरी प्रत्येकात पांडुरंग पाहतो. वारकारी संप्रदायने रुजविलेल्या परंपरेमुळे राज्य अग्रेसर आहे.

भौतिक प्रगतीमुळे शांती मिळत नाही तर मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. संत परंपरेमुळे, त्यांनी दिलेल्या अध्यात्मिक विचारमुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे. प्रत्येक गावातील भागवत सप्ताहामुळे हा विचार सर्वदूर पोहोचविण्यास मदत होत आहे. अध्यात्मिक बैठकीशिवाय मनःशांती मिळत नाही. या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत देश भारत आहे आणि ही श्रीमंती संतांनी टिकवली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

वारीत स्वयंशिस्त असते, वारी करणाऱ्यांच्या जीवनात वेगळा आनंद निर्माण होतो. गितेतला विचार वारीद्वारे रुजविण्याचा प्रयत्न होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी गितेतील हा विचार ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीतून मांडला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाविताना ज्ञानेश्वरी ग्रंथ उदाहरण म्हणून प्रस्तुत करण्यात आला, असेही श्री. फडणवीस म्हणाले. अशा अध्यात्मिक सोहळ्याच्या माध्यमातून विचारांचे वैभव पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

योगी निरंजननाथ यांनी प्रस्ताविकात सोहळ्याची माहिती दिली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या ‘नमो ज्ञानेश्वरा’ या ग्रंथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच याच पुस्तकाच्या ऑडिओ बुकचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यात अन्नदान करणाऱ्या जगताप कुटुंबियांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.