Aapala Dawakhana in Pune | आपला दवाखाना सद्यस्थिती व निधीबाबत आढावा
Pune News – (The Karbhari News Service) – पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील हिंदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची सद्यस्थिती व त्यासाठीच्या निधी उपलब्धतेबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य विभागाकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. पुणे (PMC) व पिंपरी चिंचवड महापालिके (PCMC) करिता मंजुर एकूण ९१ दवाखान्यांपैकी पुणे महानगरपालिके (Pune Municipal Corporation ) अंतर्गत ०८ व पिंपरी चिंचवडमधील ०७ दवाखाने सुरू झाले असून उर्वरीत आपला दवाखाने तातडीने सुरु करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी आरोग्य विभागाचे डॉ. स्वनील नाळे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, महानगरपालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक, सहायक संचालक डॉ. दिप्ती देशमुख, विशेष कार्य अधिकारी प्रशांत पिसाळ आदी उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्यातील विविध शहरांमध्ये गोरगरीब नागरिकांच्या सेवेसाठी हिंदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार आपला दवाखाना सुरु करण्यासाठी ज्याठिकाणी स्वतःच्या जागा उपलब्ध आहेत तेथील भाड्यापोटी मिळणारा निधी जागेची डागडुजी, नूतनीकरण, यंत्र सामुग्री खरेदी, अतिरिक्त औषधे खरेदी यासाठी वापरण्यास मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावेत, प्रस्तावास मान्यता मिळेपर्यंत स्वतःच्या जागेवर आपला दवाखाना सुरु करण्यात यावेत. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये दिरंगाई होणार नाही याची काळजी घ्यावी. रुग्णांच्या सोयीसाठी जनरेटर, डास संरक्षक जाळ्या, आवश्यक उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत. झोपडपट्टी भागात पावसाळ्यात पाणी साठून रुग्णांची गैरसोय होणार नाही, अशी जागा निवडावी, अशा ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वापरुन बांधकाम, डागडुजी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
त्या पुढे म्हणाल्या, आरोग्य सेवा तत्परतेने देणे गरजेचे असून महानगरपालिकेने प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन सद्यस्थिती कळवावी. ज्या ठिकाणी नागरिकांचा विरोध होत असेल तेथे जनसुनावणी घेऊन जागा निश्चित करावी आणि दवाखाने कार्यान्वित करावेत.दि २५ मे पासुन शासनाचा आरोग्य विभाग, मनपा व सामाजिक संस्था यांच्या समन्वयाने आरोग्य शिबिरे या ठिकाणी घेण्याचे नियोजित असून महिलांची रक्त तपासणी,कॅल्शियम व लोह कमतरता तपासून औषध वाटप इत्यादी आरोग्य सुविधांवर भर देण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले .
000
COMMENTS