Anna Bhau Sathe Jayanti | अण्णा भाऊ साठे मराठी साहित्यातील कोहिनूर: डॉ. वसंत गावडे   | ओतूरच्या वाघिरे महाविद्यालयात अण्णाभाऊ जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात

HomeBreaking News

Anna Bhau Sathe Jayanti | अण्णा भाऊ साठे मराठी साहित्यातील कोहिनूर: डॉ. वसंत गावडे | ओतूरच्या वाघिरे महाविद्यालयात अण्णाभाऊ जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात

Ganesh Kumar Mule Aug 03, 2026 8:39 PM

Dr Vasant Gavde on Writing Skill | “लेखन म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नव्हे, तर विचार, भावना, अनुभव आणि कल्पनांचे प्रभावी शब्दरूप होय” | डॉ.वसंत गावडे
Annasaheb Waghire College | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात “भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा
Marathi Language Day : Annasaheb Waghire College : अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” विविध उपक्रमांनी साजरा 

Anna Bhau Sathe Jayanti | अण्णा भाऊ साठे मराठी साहित्यातील कोहिनूर: डॉ. वसंत गावडे

| ओतूरच्या वाघिरे महाविद्यालयात अण्णाभाऊ जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात

लेखन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना सामाजिक जाणिवेचा संदेश

 

Dr Vasant Gavde – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी एनएस आणि एनसीसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. (Annasaheb Waghire College Otur)

कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही महान विभूतींच्या प्रतिमापूजन आणि पुष्पहार अर्पण करून झाली. “अण्णाभाऊ साठे अष्टपैलू साहित्यिक” या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. वसंत गावडे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एनएस प्रमुख डॉ. राजेंद्र आंबवणे यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार अण्णाभाऊ साठे जयंती “लेखन प्रेरणा दिन” म्हणून साजरी करण्यात येत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी जहाल राष्ट्रवादी विचारसरणीचे नेतृत्व करत भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा दिली. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या संघर्षमय जीवनातून आणि साहित्यातून समाजातील वंचित, उपेक्षित आणि कष्टकरी घटकांच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या. समाजपरिवर्तनासाठी साहित्य हे प्रभावी माध्यम ठरू शकते याचे सर्वोत्तम उदाहरण अण्णाभाऊ आहेत.

प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते डॉ. वसंत गावडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा सखोल परामर्श घेतला. ते म्हणाले, अण्णाभाऊ साठे हे काळाच्या पुढे पाहणारे साहित्यिक होते. त्यांच्या साहित्यात वास्तववादी, क्रांतिकारी आणि मानवतावादी विचारांचा संगम आढळतो. मराठी साहित्यविश्वात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. मराठी साहित्यातील ते एक कोहिनूर हिरा होते. त्यांच्या लेखनात जीवनाचे वास्तव, सामाजिक विषमता, श्रमिकांचे प्रश्न आणि परिवर्तनाची तळमळ स्पष्टपणे दिसते. उपेक्षित आणि श्रमिक समाजाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी केलेले लेखन आजही तितकेच प्रेरणादायी आणि समकालीन आहे. अण्णा भाऊंनी साहित्याच्या माध्यमातून वंचित आणि शोषितांच्या भावना जगासमोर मांडत सामाजिक समतेचा संदेश दिला.

अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील असंतोषाचे जनक होते. त्यांनी स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम आणि लोकजागृतीची ज्योत प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रज्वलित केली. विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊंच्या विचारांचे अनुकरण करून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमासाठी ओतूर पोलीस स्टेशनचे एपीआय ज्ञानेश्वर बाजगिरे उपस्थित होते. डॉ. एकनाथ कबाडी, डॉ. राहुल पाटील, डॉ. किशोर काळदंते, प्रा. सुनिता दाते, प्रा. प्राजक्ता काळदंते आणि एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ. विनायक कुंडलिक यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. आशिष जगताप यांनी मानले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: