Dr Vasant Gawde | युवा पिढीसाठी मूल्य शिक्षण गरजेचे | प्रा. डॉ. वसंत गावडे
Pune News – (The Karbhari News Service) – संघवी केशरी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यशिक्षण या विषयावरील जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीश पवार जीवनामध्ये मूल्यांचे महत्त्व या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जीवन जगत असताना काहीतरी मूल्य असले पाहिजे जर मूल्यच नसतील तर जीवन निरर्थक आहे. चांगली मुले जीवनाला दिशा देतात व मूल्यांची जपणूक ही लहानपणापासूनच करणे आवश्यक आहे , असे अध्यक्ष मनोगतात मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी धिरज शाखापुरे यांनी विद्यापीठाचे मूल्यशिक्षण रुजवण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्याकडून समाजाची मोठ्या प्रमाणात सेवा होत असते. ही सेवा करत असताना अशी कार्यशाळा उपयोगी ठरते असे सांगितले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. संतोष काशीद यांनी केले. आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख प्रा.प्रवीण जावीर यांनी केले.
प्रथम सत्रामध्ये डॉक्टर श्रीरंजन आवटे यांनी संविधानातील मुल्ये ही जीवनाला कशाप्रकारे आकार देतात. स्वातंत्र्य,समता सहभाव हीच मुल्ये संविधानाच्या माध्यमातून मानवाच्या जीवनामध्ये उतरलेली आहेत. या मूल्याच्या आधारेच स्वतंत्र भारतामध्ये व्यक्तीस्वातंत्र्याचे मोठ्या प्रमाणात संवर्धन झालेले आहे. भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये सर्व घटनाकारांनी जीवनविषयक मूल्य यावी यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. भारतीय संविधान हे कुठल्याही ईश्वराला समर्पित न करता भारतीय जनतेला समर्पित केले.यातूनच हे संविधान मानवाच्या कल्याणासाठी काम करेल हे संदेश देणारे होते. बहुमत म्हणजे सर्वांचे कल्याण असे समजणे चुकीचे आहे, हेही त्यांनी सांगितले. संविधानातील मूल्यांशिवाय मनुष्याचे कल्याण होणे अशक्य आहे. म.गांधी, पं.नेहरू, डॉ.आंबेडकर, म.फुले, छ.शाहू महाराज या सर्वांच्या विचारांमध्ये असलेले मूल्ये ही संविधानात उतरलेले आहेत, असे डॉ. श्रीरंजन आवटे यांनी प्रतिपादित केले.
प्रथम सत्राचे सूत्रसंचालन प्रा.अविनाश कदम यांनी केले व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा .शितल शिरवले यांनी केले.
द्वितीय सत्रात डॉ.वसंत गावडे यांचे “जीवनासाठी मूल्यशिक्षण”या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले, ते आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात म्हणाले,”विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक,पालक, नेते यांच्यावरही मूल्यांचे संस्कार करणे आवश्यक आहे. भावी पिढी आदर्शवत होण्यासाठी जीवनमूल्ये रुजविणे गरजेचे आहे. युवा पिढीसाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे. मूल्य शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे देशासाठी आदर्श नागरिक निर्माण होतील. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी मूल्य शिक्षण ही काळाची गरज आहे.”
दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया रोटे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.नितीन जाबरे यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. धिरज शाखापुरे व प्रा. शितल शिरवले यांनी केले. संयोजन मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रवीण जावीर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक रवी कांबळे, यश गावडे, अभिषेक कांबळे, प्रणव राऊत, आदित्य बनसोडे, प्रतीक जाधव, सायली भंडारी, प्रिया माने, अर्पिता सरवदे, महेश देशमुख, अश्विनी वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीमान.शांतीलालजी लुंकड, ऑनररी जनरल सेक्रेटरी श्रीमान ॲड. राजेंद्रकुमारजी मुथा, कोषाध्यक्ष श्रीमान प्रकाशचंदजी चोपडा व कार्यकारी अधिकारी श्रीमान खंडूजी खिलारे यांनी शुभेच्छा दिल्या.
COMMENTS