Anantrao Pawar college | मुळशी तालुक्याच्या शैक्षणिक विकासासाठी अनंतराव पवार महाविद्यालयाचे महत्त्वपूर्ण योगदान | राजेंद्र घाडगे
Pune News – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील गुणवंत विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक यांचा गुणगौरव तसेच विद्यार्थ्यांन आपले कलाविष्कार सादर करण्यासाठी दि. ०१ मार्च २०२५ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक समारंभाचे आयोजन सुरभी हॉल, पिरंगुट येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संकेत काळे (शरीरसौष्ठवपटू, मि. युनिव्हर्स, रौप्य पदक विजेते) अंकुश मोरे (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मुळशी तालुका), अनिल विभूते (विरिष्ठ पोलीस निरीक्षक, बावधन), यावेळी व्यासपीठावर मा. प्राचार्य बी. जी. लोबो, उपप्राचार्य डॉ. एस. बी. शिंदे, ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी’ या चित्रपटातील प्रमुख कलाकार सयाजी शिंदे, . नामजोशी, पार्थ भालेराव, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनिल मरे, प्रा. दत्तात्रय फटांगडे तसेच चित्रपटातील इतर कलाकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी महाविद्यालयाची माहिती देऊन शैक्षणिक वर्षामध्ये महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. या विविध कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना गुणवत्ता वाढीसाठी कसा उपयोग झाला हे सांगितले.
अध्यक्ष स्थानावरून मा. श्री. राजेंद्र घाडगेसाहेब यांनी पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सोयीसुविधांची माहिती दिली. मुळशी तालुक्यातील शैक्षणिक विकासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचे काम उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांनी केल्याचे नमूद करून अनंतराव पवार महाविद्यालयाच्या विकासासाठी माजी प्राचार्यांचे योगदानही अधोरेखित केले. तसेच त्यांनी स्व. अनंतराव पवार यांच्या कार्याचीही ओळख करून दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रम, प्लास्टिक संकलन उपक्रम आदी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मा. श्री. संकेत काळे यांनी आपल्या शालेय-महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत मी देखील पुरस्कार न मिळणाऱ्यांमधीलच एक आहे. पण आपण खचून न जाता आपले ध्येय गाठले पाहिजे. पुढे ते म्हणाले की, आपले शिक्षक हे आपणाला शिक्षा म्हणून बोलत नसतात ; तर ते आपणाला घडविण्यासाठी बोलत असतात, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपण आपला वेळ आणि ऊर्जा ही चुकीच्या ठिकाणी वापरू नये हे देखील सांगितले तसेच आपल्याकडून इतरांचेही कल्याण होईल असे काम करण्याचे आवाहन केले.
अंकुश मोरे म्हणाले की, विद्यार्थी हा महाविद्यालयातूनच विविध कलागुण दाखवत असतो आणि या कलागुणांमुळेच आज त्याचा गुणगौरव होत आहे. बक्षीस न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी देखील यातून प्रेरणा घेऊन यश संपादन करावे. मुळशी तालुक्यातील उच्च शिक्षणाविषयी ते म्हणाले की, मुळशी तालुक्यात उच्च शिक्षणाची आता सुरुवात झालेली आहे. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण आज आपणाला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध शाळा महाविद्यालयांमधून दिले जात आहे आणि त्यातूनच गुणवंत विद्यार्थी, नागरिक घडावेत ही अपेक्षा व्यक्त केली.
अनिल विभुते बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खूप क्षमता असून ती सिद्ध करणे गरजेचे आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपली सोबत कोणाशी ठेवावी याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तसेच पुढे त्यांनी गुन्हेगारी बाबत महत्त्वाची माहिती सांगून झटपट श्रीमंतीचे मार्ग कसे चुकीचे आहेत आणि कष्टाला पर्याय राहिलेला नाही, हे अधोरेखित केले.
यावेळी विशेष नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. तसेच सयाजी शिंदे आपली भूमिका साकारत असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी’ या चित्रपटाचे प्रमोशन सर्व कलाकारांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्यातील प्रबोधनपर विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पालक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वार्षिक पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम समारंभ संपन्नतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS