MSEDCL Smart Meter | पुण्यात पथदिवे, सिग्नल बंद; महावितरणच्या मीटर अपडेटचा फटका! | ७ कोटी भरूनही वीजपुरवठा खंडित | पुणे महापालिकेचा खुलासा
| स्मार्ट मीटर यंत्रणेतील तांत्रिक अडचणीमुळे वीजपुरवठा विस्कळीत, दोष दूर करण्याचे काम सुरू
PMC Electricity Department – The Karbhari News Service : पुणे शहरातील पथदिवे आणि काही चौकांमधील वाहतूक सिग्नलचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा आणि वाहतूक व्यवस्थेतील अडचणींचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, पुणे महापालिकेने चालू महिन्याच्या वीज बिलापोटी महावितरणला तब्बल ७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम आगाऊ भरली असतानाही हा प्रकार घडला. महावितरणच्या प्रीपेड स्मार्ट मीटर यंत्रणेच्या अद्ययावतीकरणादरम्यान निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाने स्पष्ट केले आहे.
पुणे महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत शहरातील पथदिवे, वाहतूक सिग्नल, शाळा, दवाखाने आणि उद्याने यांसह विविध सुविधांसाठी महावितरणकडून ३४८ वीजजोडण्या घेण्यात आल्या आहेत. या सर्व वीजजोडण्यांवर मे २०२५ पासून प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. या व्यवस्थेनुसार महापालिकेकडून दरमहा अंदाजित वीज वापराच्या बिलाची रक्कम आगाऊ भरली जाते.
सात कोटींचा भरणा; तरीही वीजपुरवठा खंडित
चालू महिन्याच्या वीज बिलापोटी महापालिकेने ५ ऑक्टोबर २ रोजी ७ कोटी ६ लाख १६ हजार १५० रुपये महावितरणकडे जमा केले आहेत. असे असतानाही ८ ऑक्टोबर २०२६ रोजी शहरातील पथदिवे आणि सिग्नलचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे या प्रकारामागे थकित वीज बिलाचे कारण नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महापालिकेच्या विद्युत विभागाने महावितरणकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी स्मार्ट मीटर यंत्रणेच्या अद्ययावतीकरणाच्या कामात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने वीजजोडण्या खंडित झाल्याचे महावितरणकडून कळवण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
तांत्रिक दोष दूर करण्यासाठी समन्वय
वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील पथदिवे आणि वाहतूक सिग्नलच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला. विशेषतः रात्रीच्या वेळी पथदिवे बंद राहिल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा, तर चौकांमधील सिग्नल बंद पडल्यास वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
महावितरणशी समन्वय साधून तांत्रिक दोष दूर करण्याचे आणि वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याचे पुणे महापालिकेच्या मुख्य अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, महापालिकेने आगाऊ रक्कम भरल्यानंतरही स्मार्ट मीटर यंत्रणेतील तांत्रिक अडचणीमुळे पथदिवे आणि सिग्नल बंद पडल्याने ही यंत्रणा किती सक्षमपणे कार्यरत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वीजपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होऊन शहरातील पथदिवे आणि सिग्नल सुरळीत सुरू होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

COMMENTS