Pune MPSC Student Protest | पुणे बंद करून दाखवाच; पुणेकर काय आहेत ते कळेल — महापौरांचे रोहित पवारांना थेट आव्हान

Manjusha Nagpure, Mayor, Pune.

HomeBreaking News

Pune MPSC Student Protest | पुणे बंद करून दाखवाच; पुणेकर काय आहेत ते कळेल — महापौरांचे रोहित पवारांना थेट आव्हान

Ganesh Kumar Mule Oct 06, 2026 4:46 PM

MLC Election Pune | पुण्याची जागा भाजपनेच लढवावी | इच्छुक गणेश बिडकरांसह पुणे जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्र्यांशी भेट
Ganesh Bidkar : गणेश बिडकर यांच्या वाढदिवसानिमित्त : सोमवार पेठ, रास्ता पेठ परिसरात विविध विकास कामांच्या कार्यक्रमांचे आयोजन 
TP Scheme : PMC GB : टीपी स्किमचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध करण्यास मुख्य सभेची मान्यता 

Pune MPSC Student Protest | पुणे बंद करून दाखवाच; पुणेकर काय आहेत ते कळेल — महापौरांचे रोहित पवारांना थेट आव्हान

विद्यार्थी आंदोलनाला राजकीय वळण दिल्याचा आरोप; गणेश बिडकर यांचाही रोहित पवारांवर हल्लाबोल

 

Pune Mayor Manjusha Nagpure – (The Karbhari News Service) – पुणे शहरात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) उपस्थित होते. विद्यार्थी आंदोलनाच्या आडून राजकीय भूमिका घेतली जात असल्याचा आरोप महापौर आणि बिडकर यांनी केला. (Rohit Pawar)

महापौर म्हणाले, “विद्यार्थी शहराला त्रास देत नाहीत. पुणे हे विद्यार्थ्यांचे शहर आहे आणि शहराने नेहमीच विद्यार्थ्यांना सांभाळले आहे. त्यांच्या अडचणी आम्ही समजून घेतो आणि त्या मांडल्याही पाहिजेत. इतके दिवस चर्चा सुरू होती, आम्ही कधी आडवे आलो नाही. मात्र आता याला वेगळे वळण दिले जात आहे.”

“पुणे बंद करून दाखवा”

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुणे बंदचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी त्यांना थेट आव्हान दिले.

“रोहित पवार म्हणाले पुणे बंद पाडणार. मात्र त्यांना माझे आव्हान आहे की त्यांनी पुणे बंद पाडून दाखवावे. पुणेकर काय आहेत हे त्यांना कळेल. पुणेकरांपेक्षा कोणीही मोठे नाही. पुणेकर संयमी आहेत, पण त्यांना गृहीत धरू नका,” असे महापौर म्हणाले.

गणेश बिडकर यांचा रोहित पवारांवर हल्लाबोल

गणेश बिडकर यांनीही आंदोलनाच्या राजकीय स्वरूपावर टीका केली.

“हे राजकीय आंदोलन सुरू आहे. मूळ विद्यार्थी कधीही पुणे बंदची धमकी देऊ शकणार नाही. रोहित पवारांना आपला राजकीय अजेंडा पुढे न्यायचा आहे. त्यांची मागणीच घटनाबाह्य आहे, ती कधीही पूर्ण होऊ शकत नाही,” असा दावा बिडकर यांनी केला.

विद्यार्थ्यांनी राजकीय नेत्यांच्या नादी लागू नये, असे आवाहन करत बिडकर म्हणाले, “हे उद्याचे अधिकारी आहेत. त्यांनी राजकीय लोकांच्या नादी लागून स्वतःचे करिअर खराब करू नये.”

विद्यार्थ्यांनी करिअरवर लक्ष केंद्रित करावे

महापौरांनी विद्यार्थ्यांना आंदोलनापेक्षा शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

“विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपले करिअर घडवावे. ज्या पक्षांना स्वतःचे अस्तित्व नाही, अशा पक्षांच्या नादी लागू नये. आंदोलनामुळे त्रास होतोय, तरीही आम्ही तक्रार केली नाही. पण इथून पुढे पुणे शहर हे आंदोलन सहन करणार नाही,” असे महापौरांनी स्पष्ट केले.

तसेच संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या चौकटीत राहून मागण्या कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

“शरद पवार, सुप्रिया सुळे स्वतः पुण्यात राहतात, त्यांना तरी हे पटते आहे का? पुणे पोलिसांनी तरी काय करावे? याचा विचार रोहित पवारांनी करावा. पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे,” असेही महापौर म्हणाले.

“आंदोलनाच्या विरोधात नाही, पुणे बंदच्या विरोधात”

बिडकर यांनी शेवटी सत्ताधाऱ्यांची भूमिका स्पष्ट करताना म्हटले, “आमची भूमिका आंदोलनाच्या विरोधात नाही, तर पुणे बंदच्या विरोधात आहे. बंद करणार असाल तर आम्ही त्याला उत्तर देऊ.”

महापौर आणि माजी महापौरांच्या या भूमिकेमुळे पुण्यातील विद्यार्थी आंदोलनाला आता राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. रोहित पवार यांच्या पुणे बंदच्या भूमिकेवर सत्ताधाऱ्यांनी थेट आव्हान दिल्याने आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: