१५ ते १८ वयोगटाचा कोरोना लसीकरण प्रारंभ
पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे महापालिका हद्दीत १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरणाचा प्रारंभ महापालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटलमध्ये करण्यात आला. पुणे शहरात ४० लसीकरण केंद्रांवर नव्या वयोगटासाठी कोवॅक्सिन लस उपलब्ध करण्यात आली आहे. तर पुणे महानगरपालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांना करोना प्रतिबंधक लस देण्यास सोमवारी सुरुवात झाली. महानगपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असून त्यासाठी आवश्यक असलेल्या लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुकर व्हावे, यासाठी पालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागातील ४० केंद्र सुरू करण्यात आली आहेत. लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांचे स्वागत महापौर आणि सभागृह नेते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. करोनावर मात करण्यासाठी या वयोगटातील मुलांसह ज्या नागरिकांचा अद्यापही पहिला आणि दुसरा डोस शिल्लक आहे, त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन बिडकर यांनी यावेळी केले.
‘१५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांमध्ये लसीकरणासाठी उत्स्फूर्तपणा दिसला हे खूप आशादायक चित्र आहे. लाभार्थ्यांची ही सकारात्मकता लसीकरणाला चांगला वेग देईल हा विश्वास वाटतो. महापालिकेची लसीकरण यंत्रणाही पूर्ण क्षमतेने सज्ज असून वेगाने आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कमीत कमी कालावधीत लस देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असेल’
मुरलीधर मोहोळ, महापौर.
——–
लस घेण्यासाठी आलेल्या या मुलांमध्ये लसीकरणाबाबतची उत्सुकता ही प्रचंड सकारात्मकता देणारी होती. या लसीकरणासाठी प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक ते नियोजन करण्यात आलेले आहे.
– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका
COMMENTS