PMC – Pune Metro | स्वारगेट-कात्रज मेट्रोसाठी कात्रज चौकातील महापालिकेची जागा मेट्रोला मालकी हक्काने दिली जाणार
| शहर सुधारणा समितीची मान्यता
| 1.67 कोटींचा मोबदला मिळणार, पार्किंग आणि बस बे ची अट कायम
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-1 अंतर्गत स्वारगेट ते कात्रज भूयारी मार्गावरील कात्रज मेट्रो स्थानकाच्या प्रवेश आणि निर्गम द्वाराच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या महापालिकेच्या जागेला शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे. कात्रज चौकातील पुणे महापालिकेच्या मालकीची 592.64 चौ.मी. जागा आता महामेट्रोला मालकी हक्काने हस्तांतरित केली जाणार आहे. (PMC City Improvement Committee)
महापालिका प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने हिरवा कंदील दिला आहे. या जागेसाठी महामेट्रोकडून 1 कोटी 67 लाख 83 हजार 565 रुपये आर्थिक मोबदला महापालिकेला मिळणार आहे. हा प्रस्ताव आता पुढील मंजुरीसाठी स्थायी समिती आणि मुख्य सभेसमोर जाणार आहे.
कात्रज चौकातील जुना सर्वे नं. 138 नवीन 85 मधील 592.64 चौ.मी. क्षेत्र ही जागा सध्या सार्वजनिक पार्किंगसाठी वापरली जाते. स्वारगेट ते कात्रज भूयारी मेट्रो मार्गाच्या कात्रज स्थानकाचे प्रवेश आणि निर्गम द्वार येथेच उभारले जाणार असल्याने ही जागा कायमस्वरूपी आवश्यक असल्याचे महामेट्रोने मागणी केली होती.
भूसंपादन कायद्यान्वये 1 नोव्हेंबर 1975 रोजी हा भूखंड जकात नाक्यासाठी संपादित करून महापालिकेच्या ताब्यात आला होता.
*पार्किंग आणि बस स्थानकाला धक्का नाही – अटी काय आहेत*
जागा हस्तांतरित करताना महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी दोन महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत आणि त्यांना समितीनेही मान्यता दिली आहे.
पहिली अट: सध्या असलेली सार्वजनिक पार्किंग आणि PMPML बस स्थानकाची क्षमता कमी होणार नाही. त्यासाठी महामेट्रोला नवीन बांधकामात किमान तळमजला G, G-1 किंवा G+1 या स्तरावर आवश्यक पार्किंगची जागा आरक्षित ठेवावी लागेल. पार्किंगसाठी मुख्य रस्त्यावरून स्वतंत्र प्रवेश आणि निर्गम द्वारही असावे लागेल.
दुसरी अट: PMPML च्या बसेसची ये-जा सुरळीत राहण्यासाठी नवीन इमारतीत विद्यमान बस बे चा समावेश करणे बंधनकारक असेल.
शासन निर्णयानुसार ही जागा हस्तांतरित केली जाणार आहे. सन 2026-27 च्या शिरस्तेदारीप्रमाणे खुल्या जागेचा दर 82320 रुपये प्रति चौ.मी. पकडून या जागेचे एकूण मूल्य 1,67,83,565 रुपये निश्चित झाले आहे. ही रक्कम महामेट्रोमार्फत महापालिकेच्या आर्थिक दाखल्यातून समायोजित केली जाईल.
दरम्यान, पुणे मेट्रो टप्पा-1 साठी महापालिकेच्या मालकीच्या 20 जागा यापूर्वीच भाडेपट्ट्याने देण्यात आल्या आहेत. कात्रज स्थानकाचे काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी ही जागा कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

COMMENTS