PMC Fire Brigade | दीड वर्षांत पुणे महानगरपालिका अग्निशमन दलातील ३९ जवानांची राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड
Pune PMC News – (The Kabhari News Service) – पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाने मनुष्यबळाच्या गुणवत्तावृद्धी व आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत अग्निशमन दलातील ३९ जवानांची केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (National Fire Service College – NFSC), नागपूर येथे सब ऑफिसर, स्टेशन ऑफिसर व डिव्हिजनल ऑफिसर या उच्चस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी १९ जवानांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असून, जुलै ते डिसेंबर २०२६ या सत्रासाठी आणखी २० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. पुणे महानगरपालिका अग्निशमन दलासाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
अग्निशमन दलातील जवान हे आग, पूर, इमारत दुर्घटना, रासायनिक अपघात तसेच विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असतात. बदलत्या तांत्रिक आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी त्यांना आधुनिक अग्निशमन, बचावकार्य, नेतृत्व, आपत्ती व्यवस्थापन आणि घटना नियंत्रण यांचे उच्चस्तरीय प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असते. याच उद्देशाने राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयामार्फत देशभरातील पात्र कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता, शैक्षणिक पात्रता व निर्धारित निकषांच्या आधारे मर्यादित जागांवर प्रवेश दिला जातो.
मर्यादित जागांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाला एवढ्या मोठ्या संख्येने प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणे ही उल्लेखनीय बाब आहे. या प्रशिक्षणामुळे भविष्यात शहरातील नागरिकांना अधिक प्रशिक्षित, सक्षम व आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अधिकाऱ्यांकडून अधिक प्रभावी अग्निशमन व बचाव सेवा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच विभागाची कार्यक्षमता, नेतृत्व विकास, आपत्कालीन प्रतिसाद क्षमता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेतही लक्षणीय वाढ होणार आहे.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या सकारात्मक पाठबळामुळे, सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रभावी समन्वयामुळे प्रथमच भारतातील कोणत्याही महानगरपालिकेला अधिकारी प्रशिक्षणासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध झाल्या. अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या प्रशिक्षण प्रक्रियेला गती मिळाली असून, त्यामुळे अग्निशमन दलातील जवानांमध्ये उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी भावना अग्निशमन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
पुणे महानगरपालिका अग्निशमन दल भविष्यातही आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौशल्यवर्धन, आधुनिक प्रशिक्षण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर भर देत नागरिकांना अधिक सक्षम, जलद आणि दर्जेदार आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. असा विश्वास देवेंद्र पोटफोडे यांनी व्यक्त केला
“महापौर व महापलिका आयुक्त, यांच्या भक्कम पाठबळामुळे अधिकारी प्रशिक्षणासाठी विक्रमी संख्येने जागा उपलब्ध झाल्या. हा टप्पा पुणे अग्निशमन दलाच्या गुणवत्तावृद्धी आणि आधुनिकीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
– देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी

COMMENTS