Maratha Reservation | मंत्रालयात स्वतंत्र मराठा आरक्षण कक्षाची स्थापना | ‘सारथी’ची कामे आता सचिव स्तरावर जलद मार्गी लागतील : सचिन आडेकर
Sachin Adekar – (The Karbhari News Service) – मंत्रालयात स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे मराठा क्रांती मोर्चा, पुणे शहराच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे. या कक्षामुळे ‘सारथी’ संस्था तसेच मराठा आरक्षण संदर्भातील अनेक कामे सचिव स्तरावर लवकर मार्गी लागतील, असा विश्वास मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर यांनी व्यक्त केला. (Maratha Kranti Morcha)
‘बार्टी’च्या धर्तीवर संस्थेची मागणी आमचीच
आडेकर म्हणाले, “मराठा क्रांती मोर्चाच्या पुणे जिल्ह्याच्या मोर्चामध्ये सर्वप्रथम मराठा समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी बार्टीच्या धरतीवर एक संस्था स्थापनेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ‘सारथी’ संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होत आहे.”
तांत्रिक अडचणी सुटतील
मात्र ‘सारथी’च्या कामकाजात काही तांत्रिक अडचणी येत होत्या. तसेच मंत्रालयीन मान्यता वेळेवर न मिळणे अशा गोष्टी घडत होत्या, याकडे आडेकर यांनी लक्ष वेधले. “आता स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन केल्यामुळे सारथी तसेच मराठा आरक्षण संदर्भातील अनेक कामे सचिव स्तरावर लवकर मार्गी लागतील. फाइल्सचा निपटारा जलद होऊन विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळेल,” असे आडेकर यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या निर्णयाचे स्वागत
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने राज्यभरात अभूतपूर्व मोर्चे काढले होते. आरक्षण, शैक्षणिक सवलती, वसतिगृहे यांसह विविध प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधले होते. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करणे हा सकारात्मक निर्णय असल्याचे मत आडेकर यांनी व्यक्त केले.
मराठा समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मराठा क्रांती मोर्चा पुणे शहराच्यावतीने मी स्वागत करतो, असे आडेकर यांनी शेवटी सांगितले.

COMMENTS