Pune PMC News | मलनिःसारण कामातील अपघात; पुणे महापालिकेची ठेकेदारावर कारवाई; आगामी कामांसाठी बंदी

मलनिःसारण कामादरम्यान झालेल्या अपघातानंतर संबंधित ठेकेदाराला आगामी कामांसाठी बंदी घालण्याचा आदेश.

Homeadministrative

Pune PMC News | मलनिःसारण कामातील अपघात; पुणे महापालिकेची ठेकेदारावर कारवाई; आगामी कामांसाठी बंदी

Ganesh Kumar Mule Oct 29, 2026 10:04 PM

Pune PMC News | निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढ | प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
PMC Road Department | पथ विभाग प्रमुखांना ठेकेदारांबद्दल एवढा कळवळा का? माजी नगरसेवकांचा सवाल!
Pune PMC News |  निविदेतील वाढीव कामांच्या मनमानीला चाप! | ठेकेदारांच्या ‘बॅक डोअर एंट्री’ला आळा

Pune PMC News | मलनिःसारण कामातील अपघात; पुणे महापालिकेची ठेकेदारावर कारवाई; आगामी कामांसाठी बंदी

| अपघातप्रकरणी कारणे दाखवा नोटीस, ठेकेदाराचा खुलासा आणि सुनावणीनंतर कारवाई

| पथ, भवन, मलनिःसारण, पाणीपुरवठ्यासह विविध विभागांतील कामांवर निर्बंध

 

PMC Pune – The Karbhari News Service –  पुणे महापालिकेच्या मलनिःसारण विभागाच्या कामादरम्यान झालेल्या अपघातात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मे. शुभम अशोक खातोडे यांना पुणे महापालिकेच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या पुढील कामांसाठी बंदी घालण्याचा आदेश मुख्य अभियंता (मलनि:स्सारण)  कार्यालयाकडून २९ ऑक्टोबर  रोजी जारी करण्यात आला आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिली.  (Pavneet Kaur IAS)

महापालिकेच्या आदेशानुसार, संबंधित ठेकेदाराला पथ, भवन, मलनिःसारण आणि पाणीपुरवठा यांसह महापालिकेच्या विविध कार्यालयांमार्फत दिल्या जाणाऱ्या आगामी कामांसाठी बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईसाठी महापालिका आयुक्तांच्या आदेशाचा संदर्भ देण्यात आला आहे.

| १७ ऑक्टोबरच्या अपघातानंतर कारवाई

महापालिकेच्या कार्यालयीन आदेशात नमूद केल्यानुसार, मलनिःसारण विभागाच्या निविदा क्रमांक PMC/DRAINAGE/2025/237 अंतर्गत संबंधित काम सुरू होते. या कामासाठी ठेकेदार मे. शुभम अशोक खातोडे यांना कार्यादेश देण्यात आला होता.

काम सुरू असताना १७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या अपघातात प्रदीप लक्ष्मण परदेशी (वय 69, रा. खराडी, पुणे) यांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आदेशात आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या मलनिःसारण देखभाल दुरुस्ती विभागाने संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली.

| ठेकेदाराकडून खुलासा; सुनावणीनंतर निर्णय

महापालिकेने २१ ऑक्टोबर २०२६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ठेकेदाराने २३ ऑक्टोबर रोजी आपला खुलासा सादर केला. या प्रकरणी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी महापालिका आयुक्तांसमोर सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान ठेकेदाराने केलेला खुलासा आणि प्रकरणातील बाबी विचारात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्तांच्या २९ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशाचा संदर्भ देत मुख्य अभियंता कार्यालयाने संबंधित ठेकेदाराला महापालिकेच्या विविध विभागांतील पुढील कामांसाठी बंदी घालण्याचा निर्णय कळविला.

| विविध विभागांतील आगामी कामांसाठी बंदी

या आदेशाचा परिणाम केवळ मलनिःसारण विभागापुरता मर्यादित नसून, महापालिकेच्या पथ, भवन, मलनिःसारण आणि पाणीपुरवठा आदी विभागांतील आगामी कामांवर होणार आहे. संबंधित विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांनी या आदेशाची नोंद घ्यावी, असेही कार्यालयीन पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कामादरम्यान झालेल्या अपघातानंतर कारणे दाखवा नोटीस, ठेकेदाराचा खुलासा आणि महापालिका आयुक्तांसमोरील सुनावणी या प्रक्रियेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या आदेशामुळे संबंधित ठेकेदाराला विविध विभागांतील पुढील कामे मिळविण्यावर निर्बंध आले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: