Prajit Nair IAS | पालखी सोहळ्यासाठी महापालिका सज्ज | अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या आदेशानुसार सर्वंकष नियोजन

Homeadministrative

Prajit Nair IAS | पालखी सोहळ्यासाठी महापालिका सज्ज | अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या आदेशानुसार सर्वंकष नियोजन

Ganesh Kumar Mule Jun 24, 2026 7:52 PM

PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी 7572 अर्ज | अर्ज भरण्याचा अंतिम कालावधी 29 डिसेंबर
PMC Ward 13 – Pune Station – Jay Jawan Nagar | प्रभाग क्रमांक १३ – पुणे स्टेशन जय जवान नगर | हद्दीच्या बाबतीत सर्वात जास्त चर्चा असलेल्या या प्रभागाची रचना जाणून घ्या सविस्तर 
Pune Metro Security Guard  | मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत दोन जीव वाचवले

Prajit Nair IAS | पालखी सोहळ्यासाठी महापालिका सज्ज | अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या आदेशानुसार सर्वंकष नियोजन

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – आषाढी वारी व पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने वारकऱ्यांच्या सोयीसाठी सर्वंकष तयारी सुरू केली आहे. अतिरिक्त आयुक्त (इ) प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत पालखी मार्गावरील स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, प्रकाश, वाहतूक, निवारा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली. सर्व व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याचे आदेश नायर यांनी संबंधित विभागांना दिले. (Palakhi Sohala 2026)

विभागनिहाय महत्त्वाचे आदेश

प्रकल्प व पथ विभाग: विश्रांतवाडी येथील अंडरपास परिसरात अपघात टाळण्यासाठी बॅरिकेडिंग करण्याच्या सूचना नायर यांनी दिल्या. शिवाजीनगर परिसरातील मेट्रो लाईनखालील सर्व अडथळे दोन दिवसांत दूर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पालखी मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून रस्ते सुरक्षित करण्याचे व सर्व चेंबर्स रस्त्याच्या समपातळीत आणण्याचे आदेश देण्यात आले.

घनकचरा व अतिक्रमण विभाग: पालखी मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी पोर्टेबल शौचालये उभारण्यात येणार आहेत. शौचालयांच्या स्वच्छतेसाठी जेटिंग मशीन व मनुष्यबळ नेमण्याचे आदेश देण्यात आले. पालखी आगमनापूर्वी व प्रस्थानानंतर परिसराची तात्काळ स्वच्छता, दुर्गंधी प्रतिबंधक व कीटकनाशक फवारणी केली जाणार आहे. पालखी मार्गावरील सर्व अतिक्रमणे पाच दिवस आधी हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना नायर यांनी दिल्या. सार्वजनिक स्वच्छतागृहांची दिवसातून चार वेळा स्वच्छता करण्याचेही आदेश आहेत.

विद्युत विभाग: पालखी मार्गावरील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त प्रकाशयोजना करावी. रस्त्यांवरील दिवे सुस्थितीत ठेवावेत. सीसीटीव्हीद्वारे देखरेख व डी.जी. बॅकअपची व्यवस्था करावी. नियंत्रण कक्षामार्फत सतत लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

आरोग्य विभाग: पालखी कालावधीत सर्व दवाखान्यांमध्ये पुरेसा औषधसाठा ठेवावा. ४० आरोग्य पथके, ३० डॉक्टर व रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात. वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिरे, फूट मसाज मशीन व वैद्यकीय विद्यार्थ्यांमार्फत मसाज सुविधा देण्याच्या सूचना नायर यांनी दिल्या.

भवन विभाग: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वॉटरप्रूफ मंडप उभारावेत. जागा समतल करावी. मोठ्या मैदानांवर जर्मन हॅन्गर उभारून त्यात वारकरी कार्यालय, विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, स्नानगृह, स्वच्छतागृह, आरोग्य शिबिरे उभारण्याचे आदेश देण्यात आले.

पाणीपुरवठा विभाग: पालखी सोहळ्यादरम्यान पुरेसे पिण्याचे पाणी व अतिरिक्त टँकरची व्यवस्था करावी. मार्गावरील १५ ठिकाणी पाणी वितरण केंद्र उभारावेत.
पशुवैद्यकीय विभाग: पालखीतील बैल, घोडे व इतर जनावरांसाठी विशेष पशुवैद्यकीय पथके नेमावीत.

शिक्षण विभाग: पालखी मुक्कामासाठी शाळा उपलब्ध करून द्याव्यात. तेथे स्वच्छतागृह व इतर मूलभूत सुविधा ठेवाव्यात.

बैठकीस शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त माधव जगताप, मुख्य अभियंता सोमनाथ बनकर, मनीषा शेकटकर, दिनकर गोजारे, उपायुक्त अविनाश सपकाळ, माहिती व जनसंपर्क प्रमुख तुषार बाबर, उपायुक्त आशा राऊत, अरविंद माळी, अभियंता निखील मोरे आदी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित व स्वच्छ वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे स्पष्ट आदेश दिले. ध्वनीप्रक्षेपण वाहनांद्वारे वारकऱ्यांना सूचना व जनजागृती संदेश देण्यात येणार आहेत. सर्व यंत्रणांची चाचणी पालखी आगमनापूर्वी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पुणे महानगरपालिका वारकऱ्यांना सर्व आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभाग सज्ज असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: