PMC Standing Committe | संभाजी महाराज पार्किंगची पुनर्बांधणी; शहरातील पार्किंग क्षमता वाढविणार | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती
Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) – शहरातील वाढत्या वाहतूक आणि पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेने विविध ठिकाणांवरील पार्किंग सुविधांचा विस्तार करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. त्याअंतर्गत संभाजी महाराज मल्टी लेव्हल पार्किंगची पुनर्बांधणी करून अधिक क्षमतेचे बहुमजली पार्किंग उभारण्याचा विचार सुरू असून, शहरातील इतर प्रमुख भागांमध्येही ‘बांधा वापरा आणि हस्तातंरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर नवीन पार्किंग सुविधा उभारण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Pune PMC News)
यावर आज स्थायी समिती बैठकीत चर्चा झाली. सध्या बंद असलेले संभाजी महाराज मल्टी लेव्हल पार्किंग पाडून त्या जागेवर अधिक वाहनक्षमतेचे आधुनिक बहुमजली पार्किंग उभारण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येचा आणि बदलत्या आकारमानाचा विचार करून नव्या पार्किंगची रचना करण्यात येणार आहे. विशेषतः मोठ्या वाहनांच्या उंचीचा विचार करून बांधकामाचे नियोजन केले जाणार असल्याचे अध्यक्ष भिमाले यांनी सांगितले.
याशिवाय मंडई, नारायण पेठ आणि संभाजी उद्यान परिसरातही पार्किंग सुविधा वाढविण्याचा विचार सुरू आहे. या प्रकल्पांसाठी बीओटी तत्त्वाचा अवलंब करण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे महापालिकेला थेट आर्थिक खर्च करावा लागणार नाही. खासगी सहभागातून पार्किंग सुविधा उभारून त्याचे संचालन ठरावीक कालावधीसाठी संबंधित संस्थेकडे देण्याचा पर्याय प्रशासन विचाराधीन आहे.
शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून वाहनचालकांना पार्किंगसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर पार्किंग क्षमतेत वाढ करण्यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष भिमाले यांनी सांगितले.
या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. अहवालातील शिफारशींनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असून त्यानंतर संबंधित प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले. शहरातील वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर पार्किंग व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने महापालिकेची ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

COMMENTS