Sunil Shinde on Toxic Liquor | विषारी दारू कांड | ‘गृहखाते निष्क्रिय, सरकारच जबाबदार’ – काँग्रेसचे नगरसेवक सुनील शिंदेंचा घणाघात
Pune News – (The Karbhari News Service) – पुणे पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्याने १४ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुणे काँग्रेस स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे यांनी गृहखाते व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Pune Breaking News)
नगरसेवक सुनील शिंदे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू पिऊन १४ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे कशामुळे घडलं? कोण करतंय काळे धंदे? या काळे धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम हे पोलिसांचं होतं. गृहखातं निष्क्रिय झालंय. त्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडतात.”
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधत शिंदे पुढे म्हणाले, “मुलींवर दिवसाढवळ्या अत्याचार होतात. दिवसाढवळ्या खून याठिकाणी पुणे शहरामध्ये पडतात. ड्रग्जचं जाळं दिवसेंदिवस याठिकाणी वाढत चाललंय. ते कमी होण्याचं नामोनिशाण त्याठिकाणी नाही. तरुण बिघडवण्याचं काम याठिकाणी चाललंय.”
राज्य सरकारच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत नगरसेवक शिंदे यांनी सवाल केला, “जर हे सक्षम गृहखातं असतं तर हे काळे धंदे करणारे, दारूचे अड्डे चालवणारे यांच्या मुसक्या आवळण्याचं काम त्याठिकाणी झालं असतं. इंटेलिजन्स आमचं करतंय काय? गोपनीय माहिती आमची जाते कुठे? बेकायदेशीर आणि काळे धंदे चालवण्याचं काम जे चालू आहे, त्याला थांबवण्याचं काम हे राज्य सरकारकडून होत नाही.”
“म्हणूनच अशा प्रकारच्या या घटना घडतात. आणि याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे,” असे सांगत शिंदे यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. विषारी दारूचा पुरवठा करणाऱ्यांचा शोध सुरू असून मृतांच्या नातेवाईकांना शासकीय मदतीची मागणी होत आहे. काँग्रेसने या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

COMMENTS