Pune News | आज दोन महत्त्वाच्या वृक्षतोड प्रस्तावांवर सुनावणी; नदीकाठ सुशोभीकरण व मेट्रो प्रकल्पाचे मुद्दे गाजणार
| सकाळी औंध येथे तर दुपारी कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात सुनावणी |नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील वृक्षतोड संदर्भातील दोन महत्त्वाच्या प्रस्तावांवर उ सोमवार 25 मे रोजी सुनावणी होणार आहे. दोन्ही सुनावण्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर घेतल्या जाणार आहेत.
सकाळी 11 वाजता: नदीकाठ सुशोभीकरण प्रस्ताव
पहिली सुनावणी सकाळी 11 वाजता औंध क्षेत्रीय कार्यालयातील भीमसेन जोशी सभागृह येथे होणार आहे. मुळा-मुठा नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्पासाठी प्रस्तावित वृक्षतोडीबाबत ही सुनावणी आहे. नदीपात्र विकास प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जाणार असल्याने पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये याबाबत चिंता आहे.
दुपारी 4 वाजता: मेट्रो व खासगी प्रस्ताव
दुसरी सुनावणी दुपारी 4 वाजता कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक वृक्षतोड तसेच इतर खासगी विकासकांच्या प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी कोथरूड भागातील अनेक झाडांवर कुऱ्हाड कोसळणार असल्याने स्थानिक नागरिकांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.
प्रक्रिया काय आहे?
महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडे संरक्षण व जतन अधिनियम 1975 नुसार कोणत्याही वृक्षतोडीपूर्वी वृक्ष प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. त्याआधी क्षेत्रीय अधिकारी स्तरावर नागरिकांच्या हरकती व सूचना ऐकण्यासाठी सुनावणी घेतली जाते. या सुनावणीनंतर प्राप्त हरकतींसह प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीपुढे ठेवला जातो.
पर्यावरण कार्यकर्त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सुनावणीसाठी उपस्थित राहून आपल्या हरकती नोंदवण्याचे आवाहन केले आहे. विकासकामांसाठी होणारी वृक्षतोड आणि पर्यावरणाचा समतोल यावरून पुण्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. त्यामुळे उद्याच्या दोन्ही सुनावण्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
वेळ व ठिकाण
सकाळी 11 वाजता: भीमसेन जोशी सभागृह, औंध क्षेत्रीय कार्यालय. विषय: नदीकाठ सुशोभीकरण.
दुपारी 4 वाजता: कोथरूड क्षेत्रीय कार्यालय. विषय: मेट्रो प्रकल्प व इतर खासगी प्रस्ताव.

COMMENTS