Pune Breaking News | लाल बहादूर शास्त्री यांचा पुतळा हटवण्याच्या हालचालींना विरोध
| काँग्रेस नगरसेवक सुनिल शिंदेंचा महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे इशारा
Sunil Shinde Congress – (The Karbhari News Service) – पुण्यातील मांगीरबाबा चौकात असलेला माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा एकमेव पुतळा सुशोभीकरणाच्या नावाखाली स्थलांतरित करण्याच्या प्रयत्नांविरोधात पुणे महानगरपालिकेचे सभासद सुनिल शिंदे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून निषेध नोंदवला असून, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. (Pune PMC News)
नेमका वाद काय?
लालबहादूर शास्त्री रोड ज्या ठिकाणाहून सुरू होतो त्या मांगीरबाबा चौकात स्व. शास्त्री यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्घाटन शास्त्री यांच्या वारसांच्या हस्ते झाले होते. पुण्यातील हा त्यांचा एकमेव पुतळा आहे. सभासद शिंदे यांच्या पत्रानुसार, काही बिल्डर व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुशोभीकरणाच्या नावाखाली हा पुतळा स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
“महापुरुषांचा अवमान” – सुनिल शिंदे
पत्रात शिंदे म्हणतात, “जय जवान, जय किसान”चा नारा देणाऱ्या व स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या नेत्याचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न गंभीर आहे. हा प्रयत्न म्हणजे महापुरुषांच्या कार्याचा अवमान आहे. शिंदे स्वतः त्या परिसरातील रहिवासी व सभासद असूनही त्यांना या प्रक्रियेत जाणीवपूर्वक अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आयुक्तांकडे मागणी व इशारा
सभासद शिंदे यांनी पुतळा स्थलांतरासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याची मागणी केली आहे.
“अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील,” असा स्पष्ट इशारा त्यांनी पत्राच्या शेवटी दिला आहे.
या पत्रामुळे पुण्यातील शास्त्री पुतळ्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS