PMC Fire Brigade | अग्निशमन दलातील २२ अधिकाऱ्यांना नागपुरात विशेष प्रशिक्षण

Homeadministrative

PMC Fire Brigade | अग्निशमन दलातील २२ अधिकाऱ्यांना नागपुरात विशेष प्रशिक्षण

Ganesh Kumar Mule May 07, 2026 8:30 PM

PMC Commissioner Vikram Kumar | उत्पन्न वाढीसाठी नियोजन करा  | महापालिका आयुक्तांच्या टॅक्स विभागाला सूचना 
Pune Water Cut News  | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी |  उद्या  (गुरुवारी)  पाणीपुरवठा सुरळीत सुरु राहणार
Shinde-Fadnavis Government | बेकायदेशीर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा | मोहन जोशी

PMC Fire Brigade | अग्निशमन दलातील २२ अधिकाऱ्यांना नागपुरात विशेष प्रशिक्षण

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – शहरातील वाढत्या आपत्तीजन्य घटनांचा प्रभावीपणे सामना करता यावा यासाठी पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील २२ स्टेशन ड्युटी ऑफिसर कर्मचाऱ्यांना नागपूर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमध्ये विशेष प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना ‘ऑन ड्युटी’ प्रशिक्षणासाठी पाठविण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Shrinath Bhimale PMC)

शहरात आग, नैसर्गिक आपत्ती, वायुगळती, इमारती कोसळणे, रासायनिक दुर्घटना तसेच महापूर, भूकंप यांसारख्या आपत्कालीन घटनांमध्ये अग्निशमन दलाला तातडीने मदतकार्य करावे लागते. पुणे आणि परिसरात रासायनिक कारखान्यांची वाढ होत असल्याने धोकादायक दुर्घटनांचे प्रमाण आणि स्वरूप अधिक गुंतागुंतीचे बनत आहे. नव्याने समाविष्ट गावांमध्ये भविष्यात अग्निशमन केंद्र उभारण्याचे नियोजन असल्याने प्रशिक्षित अधिकाऱ्यांची गरज वाढणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील नागपूर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज हे देशातील अग्निशमन आणि बचाव कार्यासाठीचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र मानले जाते. येथे ‘स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर्स’ तसेच ‘डिव्हिजनल ऑफिसर्स’ या अभ्यासक्रमांतर्गत आधुनिक आपत्ती व्यवस्थापन, रासायनिक दुर्घटनांवरील नियंत्रण, बचाव कार्यातील समन्वय आणि अत्याधुनिक उपकरणांच्या वापराबाबत प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे शहरातील आपत्कालीन सेवांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
—–

देवाची उरुळीत गार्डन वेस्ट प्रकल्पासाठी ५३ लाखांच्या खर्चास मंजुरी | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

देवाची उरुळी येथे गार्डन वेस्ट प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक स्थापत्य दुरुस्तीच्या कामास महापालिकेने मंजुरी दिली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या कामासाठी ५३ लाख ५२ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून, संबंधित प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

या कामासाठी मे. पूजा कन्स्ट्रक्शन, हडपसर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. कंपनीने ४५ लाख २४ हजार रुपयांची निविदा सादर केली असून, ती अंदाजपत्रकाच्या तुलनेत ३३.१५ टक्के कमी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. जीएसटी, मटेरिअल टेस्टिंग शुल्क आणि अन्य आकारांसह एकूण खर्च ५३ लाख ५२ हजार रुपयांपर्यंत जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाने या कामासाठी ७९ लाख ९९ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले होते. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी खातेप्रमुखांनी त्यास मान्यता दिल्यानंतर ६७ लाख ६८ हजार रुपयांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध वृत्तपत्रांमध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. २५ नोव्हेंबरपर्यंत निविदा स्वीकारण्यात आल्या असून, एकूण सात पात्र निविदा प्राप्त झाल्या होत्या.

महापालिकेच्या माहितीनुसार, उरुळी देवाची येथील कात्रज बायपास-सासवड रस्त्यालगतची जागा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. या ठिकाणी गार्डन वेस्टचे संकलन, वर्गीकरण आणि प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या पूर्व भागातील हिरव्या कचऱ्याची प्रभावी हाताळणी होण्यास मदत होणार आहे.

रस्ते आणि पदपथांवर पडणाऱ्या झाडांच्या फांद्या, पालापाचोळा आणि इतर हिरव्या कचऱ्याची स्वच्छता अधिक परिणामकारकपणे करता येणार असून, शहर स्वच्छतेत सुधारणा होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. स्वच्छ सर्वेक्षणातील गुणांकन वाढविण्यासाठीही या प्रकल्पाचा उपयोग होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केल्याचे भिमाले यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: