Gormale Yatra | नात्यांमधील वीण घट्ट करणारी.. नाती एकसंघ करणारी आणि दुरावा मिटवणारी गोरमाळ्याची यात्रा! 

HomeBreaking News

Gormale Yatra | नात्यांमधील वीण घट्ट करणारी.. नाती एकसंघ करणारी आणि दुरावा मिटवणारी गोरमाळ्याची यात्रा! 

Ganesh Kumar Mule Apr 19, 2026 2:28 PM

Barshi : Transgender Meeting : वर्तन चांगले ठेवा; समाज नक्कीच डोक्यावर घेईल!  : लेखक सचिन वायकुळे
Solapur Dharashiv Rain | अतिवृष्टीमुळे घरं उद्ध्वस्त झाली, पण आशा नाही! | विविध संस्थांच्या वतीने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात अन्नधान्य वितरण!
Rajendra Raut : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत च्या विकासाबाबत दिले हे आश्वासन

Gormale Yatra | नात्यांमधील वीण घट्ट करणारी.. नाती एकसंघ करणारी आणि दुरावा मिटवणारी गोरमाळ्याची यात्रा!

 

Gormale – Barshi – (The Karbhari News Service) – चैत्र महिन्यात अष्टमीला सुरु होणारी गोरमाळे गावची तीन दिवसीय यात्रा पंचक्रोशीत चांगलीच प्रसिद्ध आहे. ही यात्रा नुकतीच पार पडली.  या तीन दिवसांचे गारुड मात्र गावातील लोकांच्या मनावर पुढील कित्येक दिवस तसेच राहते. ओढ लावणारी.. भुरळ पाडणारी.. उन्हाच्या चटक्यात देखील थंडावा देणारी.. माणसं जोडणारी ही यात्रा..!

यात्रेचे विशेष म्हणजे छबिना आणि सोंगे. त्याचे आकर्षण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. प्रधानजी… आज्ञा महाराज… आपल्या कचेरीचा बंदोबस्त कैशा प्रकारे ठेविला आहे..? ही ललकारी ऐकल्यावर मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मंदिराकडे आंबील घेऊन जाताना उन्हाच्या तडाख्यात अनवाणी पायाने चालल्यावर शरीराला बधिरता येत असली तरी मन प्रफुल्लित झाल्याशिवाय राहत नाही. कुणी म्हणेल दरवर्षी तेच असते, त्याच गोष्टी.. तीच परंपरा..! त्यात वेगळे आणि नवीन काय? असे जरी असले तरी त्यात नाविन्य आहे. हा ज्याच्या त्याच्या बघण्याचा, दृष्टिकोनाचा विषय आहे. पावसाळा किंवा कुठलाही ऋतू कसा दरवर्षी काही नवीन घेऊन येतो, अगदी त्याच पद्धतीने यात्रा दरवर्षी काही नवीन देऊन जाते.

आपण लहान असताना यात्रा वेगळी वाटायची. जसे आपण मोठे होत गेलो तशी ती अजून वेगळी वाटू लागली. परंपरा तीच मात्र नावीन्य टिकून आहे. तुम्ही लहान असतानाची यात्रा आणि आता तुम्ही तुमच्या मुलाला सोबत घेऊन बघत असलेली यात्रा.. यातला फरक तुम्ही अनुभवत असाल. हा अनुभव शब्दात सांगण्याची गोष्ट नाहीच, तो फक्त अनुभवण्याचा प्रकार आहे. असे अनुभव घेणाऱ्या कुणाही माणसाला यात्रा दरवर्षी नवीन वाटल्याशिवाय राहणार नाही.

या यात्रेचे सगळ्यात विशेष म्हणजे माणसं जोडणारी, नाती टिकवून ठेवणारी, दुरावलेली नाती जवळ आणणारी, त्या नात्यातील वीण घट्ट करणारी ही यात्रा आहे. कदाचित दिवाळीला किंवा इतर सणाला तुम्ही कुटुंब म्हणून काही कारणाने एकत्र येणार नाहीत, मात्र यात्रेला तुम्ही हमखास एकत्र येता. यातला दुवा हा ग्रामदैवत सिद्धेश्वर आहे. म्हणून ही कुटुंब, परिवार एकत्र ठेवणारी यात्रा आहे. थोडक्यात ईश्वर सांगत असतो गुण्यागोविंदाने, एकत्र रहा. पण आपण माणसे ऐकत नाहीत. देवाचे अस्तित्व मानणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र कुणीतरी एक अशी प्रचंड शक्ती आहे, जे सगळ्यावर नियंत्रण ठेवत असते. आपण फक्त डोळसपणे पाहण्याची आवश्यकता आहे, आंधळेपणाने नाही.

कुण्या थोर आणि वडिलधाऱ्या लोकांनी सांगून ठेवले आहे, तुम्ही सद्यपरिस्थितीत कुठल्या कठीण प्रसंगाचा सामना करत असाल किंवा तुमची प्रगती होत नसेल किंवा तुम्ही आहे तिथेच अडकून पडला असाल, तर अशा वेळी तुम्ही तुमच्या मूळ गावी काही दिवसांसाठी जा. तिथे तुम्हाला एक वेगळी दृष्टी मिळेल. आता तुमचे मूळ गाव कुठले तर तुमच्या वडिलांचे जे गाव ते तुमचे मूळ गाव. इथे तुमची मूळे आहेत. त्यांच्याशी तुम्ही जोडून राहायला हवे आहे. तुम्ही कुठेही असा, तुम्ही तुमचे मूळ विसरता कामा नये. तुम्ही बाहेर, शहरात राहता म्हणून गावातील लोक तुम्हाला बाहेरगावचे म्हणून संबोधतील.. तुम्हाला चार दिवसाचा पाहुणा देखील म्हणतील. मात्र त्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करावे लागेल. कारण तुमचे गाव जेवढे इथे राहणाऱ्या लोकांचे आहे तेवढेच ते तुमचे देखील आहे. तिथे तुमचा अधिकार आहे. तो तुम्ही गमावता कामा नये.  तुमच्या गावच्या यात्रेला जा आणि तुमच्या मुळांशी जखडून राहा. तिथे तुमच्या आयुष्याच्या भरभराटीची बीजे लपलेली आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: