M J Pradip Chandren IAS | महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवापुस्तका बाबत महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे महत्वाचे आदेश | पेन्शन प्रकरणांना मिळणार गती
PMC Pension – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवापुस्तकाची सेवा विनियमातील तरतुदीनुसार वार्षिक पडताळणी करणे, सर्व प्रकारच्या नोंदी अद्ययावत ठेवणे व तसा दाखला सादर करणेबाबत अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांनी आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांचे महानगरपालिका सेवेतून सेवानिवृत्ती नंतर, त्यांचे सेवापुस्तकातील सेवाविषयक बाबींच्या विविध प्रकारच्या नोंदी अपूर्ण राहत असल्याने सेवानिवृत्तीनंतर सेवकांच्या सेवानिवृत्ती वेतन, देय रक्कमांचे प्रकरणी विलंब होत असल्याचे निदर्शनास आलेले होते. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिका सेवाविनियम प्रकरण ८, नियम ६७ ते ६८ मध्ये सेवापुस्तक, सेवाभिलेखाचे परिरक्षण व नोंदी करणे, सेवापुस्तकाचा ताबा, सेवापुस्तक योग्यरित्या ठेवणे, सेवापुस्तकाची वार्षिक पडताळणी करणे, दुय्यम कार्यालयाचे निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यानी सेवापुस्तकाचे निरीक्षण करणे याविषयी असलेल्या तरतुदींचे पालन करणे, तसेच याकामी मुख्य लेखा व वित्त विभाग, लेखा परीक्षण विभाग आणि सर्व खाती यांनी समन्वयाने सेवापुस्तक तपासणी शिबिराचे आयोजन करण्याबाबत परिपत्रकाने सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
असे असताना देखील सेवापुस्तकातील सेवा विषयक बाबींचे अनुषंगाने करावयाच्या नोंदीबाबत खातेस्तरावर गांभीर्यतेने कार्यवाही होत नसल्याचे व त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांच्या सेवानिवृत्ती वेतन व देय रक्कमांचे कार्यवाही प्रकरणी विलंब होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तसेच काही वेळा कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके गहाळ होण्याचे प्रकार देखील होत आहेत.
२० जुलै च्या आधी नोंदी अद्ययावत करण्याचे आदेश
अतिरिक्त आयुक्त यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे कि, पुणे मनपा सेवा विनियमातील नियम ६८ अंतर्गत असलेल्या ६८-अ ते ६८-ई मध्ये कार्यालय प्रमुखांच्या असलेल्या जबाबदाऱ्यांबाबत सर्व कार्यालय प्रमुख / खातेप्रमुख यांनी योग्य पद्धतीने कार्यवाही करावयाची आहे. त्यानुसार कार्यवाही करून सेवापुस्तकाची वार्षिक पडताळणी, सेवा पुस्तकाचे निरीक्षण करून त्यानुसार प्रमाणपत्र सेवा पुस्तकामध्ये नोंदवावे.
सेवाविषयक बाबींचे अनुषंगाने शासन निर्णयाने मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमामध्ये सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्ययावत करणेबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार सर्व खातेप्रमुख यांनी त्यांचे अखत्यारीत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवापुस्तकांमध्ये सर्व प्रकारच्या नोंदी घेऊन ती अद्ययावत करावयची आहेत. याबाबत सर्व संबंधित लेखनिकांकडून सदरची कामे करून घेऊन खात्याकडील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची सेवापुस्तके सर्व प्रकारच्या नोंदी घेऊन अद्ययावत केलेली आहेत, अशा आशयाचा दाखला २० जुलै २०२५ पूर्वी खातेप्रमुखांच्या स्वाक्षरीने सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावा. असे देखील आदेशात म्हटले आहे.

COMMENTS