प्रभाग विकासाचे मॉडेल राबविणार
: स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती
पुणे : पुणेकरांना सर्वप्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रभाग विकासाचे मॉडेल विकसित करण्यात आले असून प्रायोगिक तत्त्वावर उद्यापासून त्याची अंमबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, एक प्रभाग एक एकक मानून प्रभागाचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी प्रभाग क्रमांक 15 मधील विकासकामांची पाहाणी करणार आहेत. नागरिकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यानुसार विकासकामांचे मॉडेल तयार केले जाणार आहे. या मॉडेलची नियोजनबध्द अंमलबावणी केली जाणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या 42 प्रभागांमध्ये हे मॉडेल राबविण्यात येईल.
रासने पुढे म्हणाले, समान पाणी पुरवठा, रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन या पुणेकरांच्या मूलभूत गरजा आहेत. त्या पुरविण्यासाठी विविध खात्यांतर्गत समन्वयाची गरज असते. परंतु बहुतेकदा हा समन्वय नसल्याने एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा काम करावे लागते. त्यामुळे निधीचा अपव्यय तर होतोच पण सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होते. प्रभाग विकासाच्या मॉडेल मध्ये या सर्व बाबींचा एकत्रित समावेश केला जाईल. त्यामुळे पुणेकरांना गुणवत्तापूर्ण मूलभूत सुविधा मिळू शकतील.
रासने पुढे म्हणाले, सर्वच प्रभागांमध्ये प्राधान्याने हेच मूलभूत प्रश्न आहेत. त्या सोडविण्यासाठी पुन्हा पुन्हा लोकप्रतिनिधी, प्रशासन, अधिकारी यांना वारंवार प्रकल्प भेटी कराव्या लागणार नाहीत. त्यामुळे वेळेची बचत होऊन गतीने विकासकामे मार्गी लागतील.
उद्या सकाळी साडेसात वाजता आयुक्त विक्रम कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले मंडई येथून हा उपक्रम सुरू होईल.
COMMENTS