Bhushi Dam | लोणावळा भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
Ajit Pawar – (The Karbhari News Service) – लोणावळा येथील भुशी धरण धबधब्यात, पुण्याच्या हडपसर भागातील एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना दुर्दैवी आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि अपरिचित धोकादायक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोखण्यासाठी, धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले. भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी विधानसभेत केली.
विधानसभा सदस्य चेतन तुपे यांनी पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून भुशी धरण दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना मदत देणे आणि धोकादायक स्थळांवर सुरक्षाव्यवस्था करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भुशी धरण परिसरातील दुर्घटना दुर्दैवी असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल. या निधीतून संभाव्य धोकायदायक ठिकाणी प्रतिबंधात्मक माहिती फलक लावणे, कुंपन घालणे, सुरक्षिततेसाठी जाळ्या लावणे आदी कामे करण्यात येतील. पर्यटकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी माहितीफलक लावणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आदी कार्यवाही आधीपासूनच करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर दुर्गम धोकादायक स्थळीही सुरक्षिततेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.