PCMC | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

HomeBreaking Newsपुणे

PCMC | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

गणेश मुळे Feb 09, 2024 3:43 PM

Maharashtra Budget 2024-25 | राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर
Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Sthal Vikas | छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Chandrasekhar Bawankule | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच राजकीय स्फोट झालेला दिसेल | चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?

PCMC | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

 

 

PCMC | पिंपरी चिंचवड शहर (Pimpari chinchwad city) वेगाने विकसीत होणारे शहर असून या सुनियोजित अशा औद्यगिक नगरीची लोकसंख्याही लक्षात घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छता करणाऱ्या वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यात श्री. पवार बोलत होते. यावेळी आमदार अश्विनी जगताप, महानरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी महापौर योगेश बहल, विजयकुमार खोराटे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, शहराची देशपातळीवर ओळख व्हावी यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात, त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. यामुळे रोजगाराच्या संधीदेखील वाढत असल्याने सर्वांनी विकासकामांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात उंच इमारती बांधल्या जात आहेत. त्यासाठी सक्षम आणि अद्ययावत अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे. त्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पिंपरी चिंचवड शहराची २०३२ ची अंदाजित लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

देशात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. वंदे भारत रेल्वे, विमानतळांचे विस्तारीकरण, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आदी कामांचा समावेश यात आहे. जनकल्याणाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. देश जगातील तीसरी अर्थव्यवस्था बनण्याकडे वेगाने वाटचाल करीत आहे. त्याचा लाभ शहरातील नागरिकांनाही होत असून शहरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या रहात आहेत, असेही श्री.पवार म्हणाले.

कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, माजी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

श्री.पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी आणि गवळी माथा येथील घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कामासाठी ९ कोटी रुपये खर्च आला आहे यावेळी आमदार अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोडे, आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता (पर्यावरण) हरविंदरसिंह बन्सल, कार्यकारी अभियंता (विद्युत) अनिल भारसाखळे उपस्थित होते.

श्री.पवार यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या निवासस्थानासाठी उभारण्यात आलेली इमारत आणि पिंपरी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवनाचेही उद्घाटन केले. या भवनात ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, म्युझिक थेरपी, ऑडिओलॉजी, डान्स थेरपीसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचाराची सोय करण्यात आली आहे. बहुसंवेदी वातावरण युक्त परिसर असणारे दिव्यांग व्यक्ती अधिनियमातील तरतूदीनुसार २४ हजार चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेले देशातील पहिले केंद्र आहे. केंद्रासाठी सीएसआर फंडातून सॅंडविक कंपनीने ७२ लाख रुपयांची मदत केली आहे. केंद्राची इमारत चार मजली इमारत असून सुमारे ११ कोटी रुपये खर्च आला आहे.

काळेवाडी येथील घनकचरा व्यवस्थापनासाठीचे ट्रान्सफर स्टेशनचे उद्घाटन आणि वाकड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्टाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सांगवी येथील नूतनीकृत कै. बाळासाहेब शितोळे जलतरण तलावाचे लोकार्पण करण्यात आले.