पुणे महापालिकेच्या नेहरू स्टेडियमला ‘बॉलिवूड’ ची पसंती
| तब्बल 6 दिवस चालले सिनेमाचे शूटिंग
पुणे | पुणे महापालिकेने वर्षभरापूर्वी पं जवाहरलाल नेहरू स्टेडियम चे नूतनीकरण केले आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींकडून याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या स्टेडियम चा मोह बॉलिवूड ला देखील आवरला नाही. कारण क्रिकेटवर आधारित ‘Mr and Mrs Mahi’ या सिनेमाचे शूटिंग अर्थात चित्रीकरण नेहरू स्टेडियम वर तब्बल सहा दिवस चालले. विशेष म्हणजे पुणे शहराललगत गहुंजे सारखे आंतरराष्ट्रीय स्टेडियम असताना देखील नेहरू स्टेडियमलाच शूटिंगसाठी प्राधान्य दिले गेले. यातून महापालिकेला 18 लाखाचे उत्पन्न देखील मिळाले आहे. यामुळे महापालिका प्रशासनाचे कौतुक होत आहे.
नेहरू स्टेडियम वर कधी काळी क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. मात्र कालांतराने असे सामने होणे बंद झाले. त्यानंतर महापालिकेकडून हे स्टेडियम स्थानिक सामने, सरावासाठी उपलब्ध करून दिले जात होते. मात्र इथे थोड्याच लोकांची मक्तेदारी झाली होती. त्यामुळे शहरातील क्रिकेट प्रेमींना निराश व्हावे लागत होते. मात्र महापालिका प्रशासनाने याची दखल घेत नुकतेच याचे नवीनीकरण केले आहे. महत्वाचे हे कि काही लोकांची मक्तेदारी मोडून काढत सर्वांना संधी मिळण्यासाठी सगळा कारभार ऑनलाईन सुरु केला. शिवाय खेळपट्ट्या देखील चांगल्या दर्जाच्या केल्या. त्यामुळे इथे सामने होतात. क्रिकेट प्रेमींना सरावासाठी भाडे तत्वावर मैदान उपलब्ध करून दिले जाते. तसेच शूटिंग साठी देखील हे स्टेडियम उपलब्ध करून दिले जाते. मागील वर्षी यावर 15 लाखाचा खर्च केला गेला.
क्रिकेट प्रेमींसोबत बॉलिवूडला देखील या स्टेडियम चा मोह आवरला नाही. निर्माता करण जोहर च्या धर्मा प्रोडक्शन निर्मित आणि एका क्रिकेटर च्या जीवनावर आधारित ‘Mr and Mrs Mahi’ हा सिनेमा लवकरच येतो आहे. त्याचे शूटिंग सुरु आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यात प्रमुख भूमिकेत आहेत. क्रिकेट वर आधारित सिनेमा असल्याने तसे मैदान असणे आवश्यक होते. त्यामुळे निर्मात्यांनी मग महापालिकेकडे नेहरू स्टेडियम उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली. महापालिकेने देखील तात्काळ स्टेडियम उपलब्ध करून दिले. 6 दिवस या सिनेमाचे शूटिंग नेहरू स्टेडियम वर चालले. यासाठीचे भाडे प्रति दिवस 3 लाख असे होते. महापालिकेला यातून तब्बल 18 लाखाचे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे प्रोडक्शन टीम ने या मैदानाचे चांगलेच कौतुक केले.