Vadgaonsheri Assembly Constituency | वडगाव शेरीत आंबेडकरी चळवळीची भूमिका ठरली जाईंट किलर

HomeBreaking News

Vadgaonsheri Assembly Constituency | वडगाव शेरीत आंबेडकरी चळवळीची भूमिका ठरली जाईंट किलर

Ganesh Kumar Mule Nov 24, 2024 2:11 PM

Maharashtra Vidhansabha Election | पुणे महानगरपालिका क्षेत्रात दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींकरीता समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
Old Pension Scheme | जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक | विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार
Pavan Kalyan | स्थिर सरकार आणि विकासासाठी महायुतीला निवडून द्या | आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे आवाहन

Vadgaonsheri Assembly Constituency | वडगाव शेरीत आंबेडकरी चळवळीची भूमिका ठरली जाईंट किलर

– डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे मत; ‘आरपीआय’ला सन्मानजनक वागणूक दिली जात नसल्याने दिले होते राजीनामे

 

Maharashtra Vidhansabha Election – (The Karbhari News Service) – महाराष्ट्राच्या इतिहासात विक्रमी बहुमत मिळवलेल्या महायुतीला वडगाव शेरी मतदारसंघात मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा पराभव झाला असून, इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बापू पाठारे यांनी विजय मिळवला आहे. सुनील टिंगरे यांच्या पराभवात आंबेडकरी चळवळीची भूमिका जायंट किलर ठरली आहे. महायुतीतील घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) शेकडो पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी राजीनामे देत सुनील टिंगरे यांचे काम न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच फटका टिंगरे यांना बसला आहे.

राज्यभरात रिपब्लिकन पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे नाराज होऊन पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याचे समर्थन करीत महापालिकेतील माजी गटनेत्या फरझान अय्युब शेख व अन्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत महायुतीच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती. टिंगरे यांचा प्रचार करणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते. या भागात आंबेडकरी चळवळीशी संबंधित मतदारांची मोठी संख्या आहे. धेंडे व सहकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे ही सर्व ताकद पाठारे यांच्या पाठीशी गेल्याने किंवा तटस्थ राहिल्याने टिंगरे यांना फटका बसला आहे.

याबाबत डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका निर्णायक ठरली आहे. गेल्या अनेक वर्षात महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी आरपीआयला सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही. त्यामुळे अनेकांनी प्राथमिक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्‍यामध्ये नाराजीचा मोठा सूर होता. त्‍याचा परिणाम वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात स्‍पष्ट दिसला. या मतदारसंघात महायुतीला पराभवाचा फटका बसला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयात आंबेडकरी अनुयायी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भूमिका जाईंट किलर ठरली आहे.”