बेरोजगार युवकांच्या हाताला मिळाले काम
| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन
| 30 कंपन्यांचा सहभाग 200 युवकांनी दिल्या मुलाखती
पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मधील युवकांसह पुण्यातील अनेक बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाले आहे. माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. येरवडा येथील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मधील त्रिरत्न बुद्ध विहारात पार पडलेल्या या रोजगार मेळाव्यात 30 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. 500 जणांनी या मेळाव्याला भेट दिली. 200 जणांच्या मुलाखती झाल्या असून 125 बेरोजगार युवकांना जागेवरच रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली.
डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने झालेल्या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, आरपीआय आठवले गटाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव बाळासाहेब जानराव, माजी नगरसेवक अशोक कांबळे, भाजपा प्रवक्ता मंगेश गोळे, सुभाष चव्हाण आदीसह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
येरवडा परिसरात अनेक विविध नामांकित कंपनी, हॉस्पिटल, मॉल, हॉटेल, कुरियर कंपनी आयटी पार्क आदीसह विविध ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. मात्र युवकांना त्याबाबत कोणतीही कल्पना नसते अथवा त्यांच्यापर्यंत नोकरी उपलब्ध असल्याची माहिती पोहोचत नाही. त्यामुळे युवकांना रोजगार मिळत नाही. परिणामी युवकांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरत आहे. या बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, रोजगाराच्या संधीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, युवक हा देशाच्या विकासाचा कणा आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी युवक मोठे योगदान देत असतात. त्यामुळे त्यांना आर्थिक अंगाने सक्षम करणे ही जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. याची जाणीव ठेवून युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याचा फायदा युवकांना झाला. अनेकांना जागेवरच रोजगाराची संधी प्राप्त झाली. तर काहींना येत्या काळात लवकरच या संधी उपलब्ध होणार आहे.
सहाय्यक पोलीस उपायुक्त किशोर जाधव म्हणाले की, अनेक कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. मात्र युवकांनी तिथपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचणे गरजेचे असते. योग्य मार्ग पकडून गेल्यास रोजगार प्राप्त होतो, असे जाधव म्हणाले.
भाजपाचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक म्हणाले की, रोजगार मेळाव्यातून एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये असणाऱ्या संधीची माहिती मिळते. वर्ग 1 पासून ते वर्ग 4 पर्यंतच्या सर्व रिक्त जागांबाबत असणाऱ्या संधी समजतात. रोजगार मेळाव्यातून अशा संधी युवकांना प्राप्त करून घेता येतात. त्यामुळे हा रोजगार मेळावा युवकांसाठी उपयुक्त ठरलेला आहे.
——————————–