उल्का कळसकर, शिवाजी दौंडकर यांचे नामाभिधान आता ‘सह महापालिका आयुक्त’ असणार
पुणे | मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर आणि मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांना आता सह महापालिका आयुक्त असा दर्जा देण्यात आला आहे. महापालिकेचे खातेप्रमुख म्हणून दहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या परंतू बढतीची संधी नसलेल्या अधिकार्यांच्या पदाचे नामाभिधान ‘सह महापालिका आयुक्त’ असा करण्यात आला आहे. हे दोन्ही अधिकारी सह महापालिका आयुक्त समकक्ष समजण्यात येणार असून त्यांना सह महापालिका आयुक्तांना देण्यात येणारे सर्व फायदे व मान्य दराने विशेष वेतन देण्यात येणार आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील खातेप्रमुख संवर्गातील (वे. श्रे. रु. १५,६०० ते ३९,१००+ ८,९०० ग्रेड पे+मान्य भत्ते) पदावर सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना बढतीची संधी नाही म्हणून त्यांचे पदाचे नामाभिधान बदलून ते ‘सह महापालिका आयुक्त (जॉइंट म्युनिसिपल कमिशनर)’ असे करणेस, मात्र ज्या अधिकाऱ्यांचा हुद्दा अधिनियमात हुद्दा नमूद केल्यामुळे तो बदलता येणार नाही त्यांना सह महापालिका आयुक्त समकक्ष समजण्यात यावे व त्यांना सह महापालिका आयुक्त यांना देण्यात येणारे सर्व फायदे व मान्य दराने विशेष वेतन देण्यात यावे असे धोरण मनपा सभा ठरावान्वये मान्य करण्यात आले आहे. तसेच शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यानुसार उल्का कळसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि शिवाजी भिकाजी दौंडकर यांना मान्य ठरावानुसार त्यांचे संबोधनात बदल करण्यात येत आहे. या दोन्ही अधिकार्यांना सह महापालिका आयुक्तांना देण्यात येणारे सर्व फायदे व मान्य दराने विशेष वेतन देण्यात येणार आहे. या अधिकार्यांचे पदनाम बदलले तरी त्यांना पुर्वीच्याच हुद्यावरच व त्याच अधिकारानुसार काम करावे लागणार आहे.