मेट्रोचे आंदोलन ही खासदार बापटांची निव्वळ स्टंटबाजी
– माजी आमदार मोहन जोशी
पुणे – हिंजवडी मेट्रो लवकर सुरु करावी, या मागणीसाठी खासदार गिरीश बापट यांनी केलेले आंदोलन म्हणजे शहरातील मोठे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेले अपयश आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून केलेली निव्वळ स्टंटबाजी आहे. बापट यांची ही आदळआपट कशासाठी? अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी केली आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाची प्राथमिक तयारी प्रशासनाने पूर्ण केलेली आहे. ९८ टक्के भूसंपादनही झालेले आहे. त्यामुळे मेट्रोचे काम कधीही सुरु होऊ शकते. हे माहीत असूनही काम सुरु करावे अशा मागणीसाठी खासदार बापट यांनी आंदोलन सुरु केले. आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना खूष करण्यासाठी हा दिखाऊपणा आहे याची जाणीव भाजप नेत्यांसह पुणेकरांनाही आहे. पुण्यातील मेट्रो मार्गासाठी राज्य सरकारने कायमच पाठबळ दिले आहे. आंदोलन करुन राज्य शासनाच्या भूमिकेबद्दल दिशाभूल करण्याचा बापटांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
पुण्यात स्मार्ट सिटी योजना फसलेली आहे. मुळा-मुठा नदी संवर्धन योजना, जायका प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना असे मोठे प्रकल्प गेल्या पाच वर्षांत लांबणीवर पडलेले आहेत. खासदार बापट यांनी आता त्यासाठी आंदोलन करायला हवे, असा सल्ला मोहन जोशी यांनी दिला आहे.
COMMENTS