Supriya Sule on Pune Police | चौदा दिवसांच्या प्रतिबंधात्मक आदेशावरून सुप्रिया सुळे आक्रमक | “छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय कशाला?”

HomeBreaking News

Supriya Sule on Pune Police | चौदा दिवसांच्या प्रतिबंधात्मक आदेशावरून सुप्रिया सुळे आक्रमक | “छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय कशाला?”

Ganesh Kumar Mule May 26, 2026 12:46 PM

MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला
Pune DP | पुण्याच्या गरजांचा आढावा घेऊन विकास आराखडा तयार करावा
Pune Water Cut | दिवसाआड पाणी देणा-या गावामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेऊ नये

Supriya Sule on Pune Police | चौदा दिवसांच्या प्रतिबंधात्मक आदेशावरून सुप्रिया सुळे आक्रमक | “छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय कशाला?”

| रात्री १० नंतर फेरीवाले, खाऊ गल्ली बंदच्या आदेशावर प्रश्नचिन्ह; पोलिसांच्या भूमिकेवर टीका

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) –  पुणे शहरात लागू करण्यात आलेल्या १४ दिवसांच्या जमावबंदी व प्रतिबंधात्मक आदेशांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रात्री १० नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी व खाऊ गल्ली बंद करण्याच्या आदेशामुळे हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याची टीका त्यांनी केली. (Pune News)

काय आहे आदेश?  

पोलीस आयुक्तांनी शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. यानुसार रात्री १० नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुळे यांचे सवाल

“पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले आहे. या शहरात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करू पाहतंय?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या, “एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलिसांना अद्याप किंचितही यश आलेले नाही. शहरात गुन्हेगारी सतत वाढत असून महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलीस देऊ शकत नाहीत. कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे. गोळीबाराच्या, लूटमारीच्या, दहशत माजविल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे.”

“आजारापेक्षा उपचार भयंकर”

“लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करून पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करू पाहत आहेत? पोलीस आयुक्त जमावबंदी नाही, प्रतिबंधात्मक आदेश असं म्हणत आहेत. जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्त्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे? हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार आहे,” अशी टीका सुळे यांनी केली.

व्यावसायिकांमध्ये नाराजी  पोलिसांच्या या आदेशामुळे एफसी रोड, जंगली महाराज रोड, कॅम्प परिसरातील खाऊ गल्ली, तसेच शहरातील रात्री उशिरापर्यंत चालणारे फूड स्टॉल्स, चहाच्या टपऱ्या बंद कराव्या लागणार आहेत. रात्री काम करून पोट भरणाऱ्या हजारो छोट्या व्यावसायिक, कामगार वर्गाला याचा फटका बसणार आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने हा आदेश कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व पेट्रोल डिझेल दरवाढीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घेतल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याऐवजी सामान्य व्यावसायिकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: