PMC Solid Waste | पुण्यात स्वच्छतेच्या कारवाईचा धडाका! तीन दिवसांत ४९२ जणांवर कारवाई; ६ लाख ४ हजारांचा दंड वसूल

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाची दंडवाढीनंतर कारवाई तीव्र. २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान ४९२ पावत्या फाडून ६ लाख ४ हजार ५४० रुपये दंड वसूल.

Homeadministrative

PMC Solid Waste | पुण्यात स्वच्छतेच्या कारवाईचा धडाका! तीन दिवसांत ४९२ जणांवर कारवाई; ६ लाख ४ हजारांचा दंड वसूल

Ganesh Kumar Mule Nov 27, 2026 8:43 AM

Nana Bhangire | 7 ते 10 वर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या SI, DI च्या बदल्या तात्काळ करा | शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची पुन्हा आक्रमक भूमिका
PMC Pune Bharti | पुणे महापालिका भरती | 6 महिने होऊनही नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी अटी पूर्ण केल्या नाहीत! 
PMC Security Guard | सुरक्षा रक्षकांच्या वेतनाबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी ठरवून दिली नियमावली

PMC Solid Waste | पुण्यात स्वच्छतेच्या कारवाईचा धडाका! तीन दिवसांत ४९२ जणांवर कारवाई; ६ लाख ४ हजारांचा दंड वसूल

दंडवाढीच्या परिपत्रकानंतर PMC कडून कडक अंमलबजावणी; अस्वच्छता आणि बांधकाम राडारोड्यावर सर्वाधिक कारवाई

 

Pune PMC News – The Karbhari News Service – पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणारे, कचरा टाकणारे आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. घनकचरा विभागाने नुकतेच विविध नियमभंगांसाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्याबाबत परिपत्रक काढले होते. त्यानुसार आता दंडात्मक कारवाईला वेग देण्यात आला आहे. अशी माहिती उपायुक्त संतोष वारुळे यांनी दिली. (PMC Solid Waste Management Department)

दि. २४ ते २६ नोव्हेंबर या तीन दिवसांत महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांकडून एकूण ४९२ पावत्या फाडून ६ लाख ४ हजार ५४० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या तीन दिवसांत दंडाची रक्कम आणि कारवाईची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

तीन दिवसांतील कारवाईचा तपशील

२४ नोव्हेंबर – ९२ पावत्या – ₹१,४७,२००
२५ नोव्हेंबर – १६५ पावत्या – ₹१,९४,८२०
२६ नोव्हेंबर २३५ – पावत्या – ₹२,६२,५२०
एकूण – ४९२ पावत्या – ₹६,०४,५४०

२४ नोव्हेंबरच्या तुलनेत २६ नोव्हेंबर रोजी कारवाईच्या पावत्यांमध्ये १४३ ने वाढ झाली, तर दंड वसुली १ लाख १५ हजार ३२० रुपयांनी वाढली. तीन दिवसांत दंड वसुली जवळपास दुप्पट झाली आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई
या तीन दिवसांत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे आणि अस्वच्छता करणे हा सर्वाधिक आढळलेला नियमभंग ठरला आहे. या प्रकारात एकूण ३४१ पावत्या फाडून ३ लाख २७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

बांधकाम राडारोडा टाकण्याच्या प्रकारात २८ पावत्यांद्वारे १ लाख ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. जनरेटर कचरा न करण्याच्या प्रकारात १० पावत्यांद्वारे ७८ हजार रुपये दंड आकारण्यात आला.

याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघवी करणे, कचरा वर्गीकरण न करणे, प्लास्टिक वापर, कचरा जाळणे आणि घरगुती कचरा देण्यास नकार देणे अशा विविध प्रकारांवरही कारवाई करण्यात आली.

२६ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक कारवाई
२६ नोव्हेंबर रोजी एका दिवसात २३५ पावत्या फाडून २ लाख ६२ हजार ५२० रुपये दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात १६४ पावत्यांद्वारे १ लाख ५१ हजार २०० रुपये दंड आकारण्यात आला.

बांधकाम राडारोडा टाकल्याप्रकरणी १६ पावत्यांद्वारे ८० हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी ११ पावत्यांद्वारे ११ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईत कोंढवा-येवलेवाडी येथे २० पावत्यांद्वारे ३९ हजार रुपये, वारजे-कर्वेनगर येथे २५ पावत्यांद्वारे ३१ हजार ५०० रुपये, धनकवडी-सहकारनगर येथे २४ पावत्यांद्वारे २४ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

दंडवाढीच्या परिपत्रकानंतर कारवाईला वेग
महापालिकेच्या घनकचरा विभागाने स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडाची रक्कम वाढवण्याबाबत नुकतेच परिपत्रक जारी केले होते. त्यानंतर दंडात्मक कारवाई सुरू झाल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, अस्वच्छता करणे आणि बांधकाम राडारोडा टाकणे या प्रकारांवर महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दंडाची वाढलेली रक्कम आणि कारवाईची वाढती संख्या यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर आर्थिक दंडाचा दबाव वाढणार आहे.

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी कचरा योग्य ठिकाणी टाकणे, ओला-सुका कचरा वर्गीकृत करणे आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता टाळणे आवश्यक आहे. महापालिकेच्या कारवाईसोबत नागरिकांनीही स्वच्छतेच्या नियमांचे पालन केल्यास पुणे शहर अधिक स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: