Sharad pawar Vs Raj Thackeray : राज ठाकरेंच्या आरोपावर शरद पवारांनी दिली उत्तरे : वाचा सविस्तर

HomeBreaking NewsPolitical

Sharad pawar Vs Raj Thackeray : राज ठाकरेंच्या आरोपावर शरद पवारांनी दिली उत्तरे : वाचा सविस्तर

Ganesh Kumar Mule Apr 13, 2022 2:13 PM

MNS : आयुष्यात संघर्षाचा वनवास … वसंत मोरे म्हणाले …!
Maharashtra Navnirman Sena : भोंग्यावरून मनसेत दोन मतप्रवाह!
Raj Thackeray on Pune Flood | पुण्यातील पूर परिस्थितीत महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे राज ठाकरे यांच्याकडून कौतुक |अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन योग्य नसल्याचे व्यक्त केले मत 

राज ठाकरेंच्या आरोपावर शरद पवारांनी दिली उत्तरे

राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि शरद पवारांना टार्गेट केले होते. त्यावर आता शरद पवारांनी देखील उत्तरे दिली आहेत.
पवार म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेतील वक्तव्यांबद्दल पत्रकारांनी माझे मत विचारले. एखादी व्यक्ती वर्ष-सहा महिने एखादे वक्तव्य करत असेल तर ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पण पत्रकारांनी विचारणा केली म्हणून याबाबत माझी भूमिका मांडली.
मी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही, अशाप्रकारचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला. पण दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीत असताना केलेले संपूर्ण भाषण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर होते. कमीत कमी २५ मिनिटे मी या विषयावर बोललो होतो.
ते भाषण आपण पाहू शकता वा वर्तमानपत्रात त्याबाबत वाचू शकता. अर्थात मला रोज सकाळी उठून वर्तमानपत्र वाचण्याची सवय आहे. त्यासाठी मला लवकर उठावे लागते. ज्या लोकांना वर्तमानपत्र न वाचता मत व्यक्त करायचे असेल तर त्यांना मी दोष देणार नाही.
पवार पुढे म्हणाले, दुसरे त्यांनी असे सांगितले की, फुले-शाहू-आंबेडकर यांचाच उल्लेख केला जातो. मला याचा अभिमान आहे. या राज्यात  छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले काव्य महात्मा फुले यांनी रचले होते. त्यामुळे महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर हे शिवछत्रपतींबद्दल अतीव आस्था असणारी व्यक्तिमत्वं होती.
महाराजांचा आदर्श घेऊन आपले काम कसे करावे, यासंबंधीची भूमिका तिघांनीही मांडली. म्हणून या तिघांचा उल्लेख करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखेच आहे.
तसेच त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबतच्या माझ्या विधानाचा उल्लेख केला. पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा उल्लेख करत असताना राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडवले असे सांगण्याऐवजी दादोजी कोंडदेव यांनी ते घडविले, असे विधान केले होते. याला माझा सक्त विरोध होता.
शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व हे राजमाता जिजाऊंनी घडवले. त्यामुळे जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाचे मोठेपण मान्य केले पाहिजे. पण पुरंदरेंनी याबाबत वेगळे लिहिण्याचा प्रयत्न केला, तो योग्य नव्हता. हे माझे मत तेव्हाही होते आणि आजही आहे. असे ही पवार म्हणाले.
दुसरा गंभीर प्रश्न असा की, जेम्स लेन यांनी जे विकृत लेखन केले होते, त्याचा आधार त्यांनी पुरंदरेकडून घेतला होता, अशी माहिती जेम्स लेनने दिली होती. एखादा लेखक जर असे गलिच्छ लिखाण करत असेल व जर ती माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव घेत असेल आणि त्याचा खुलासा पुरंदरे यांनी कधी केला नसेल तर त्याबाबत टीका केली तर दुःख वाटण्याचे कारण नाही. उलट मला याचा अभिमान वाटतो.
आज खऱ्या अर्थाने लोकांसमोर प्रश्न काय होते? महागाई, दरवाढ, बेरोजगारी या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आज कुणी बोलत नाही. काल राज ठाकरे यांनी एवढे मोठे भाषण केले. त्यात सामान्य माणसांच्या प्रश्नांना यत्किचिंतही स्थान मिळालेले नाही.
ज्या पद्धतीने भाजप सत्ता चालवत आहे, त्याचाही कालच्या भाषणात उल्लेख नाही. त्यामुळे या भाषणाबाबत अधिक बोलण्याचे काही कारण नाही.
तसेच सोनिया गांधींविषयीच्या भूमिकेबाबत त्यांनी वक्तव्य केले. याबाबतीत माझे मत आधीपासूनच स्पष्ट होते. श्रीमती सोनिया गांधी यांनी जेव्हा मी पंतप्रधान पदावर जाऊ इच्छित नाही, असे जाहीर वक्तव्य केले तेव्हा तो प्रश्न तिथेच संपला होता.
आमची चर्चा त्यांच्या पंतप्रधानपदाबाबत होती, तो विषय निकाली लागल्यानंतर त्यावर वाद करण्याचे कारण नव्हते. त्यानंतर एकत्र येऊन काम करण्याची सूचना सहकाऱ्यांनी केल्यानंतर आम्ही सर्व एकत्र आलो. हे जे सर्व त्याकाळात घडले, त्याचे सविस्तर वाचन केले असते तर असे उद्गार काढले गेले नसते.
लोक राज ठाकरेंच्या सभांना जातात. त्यांच्या सभा मोठ्या होत्या, हे बरोबर आहे. पण तिथे शिवराळ भाषा असते, नकला केल्या जातात, यातून लोकांची करमणूक होते. त्यामुळे लोक भाषणाला जातात.
मी नास्तिक असल्याबाबतही त्यांनी उल्लेख केला. मी धर्माचे प्रदर्शन करत नाही. मी आजवर १२ ते १४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो. माझा प्रचाराचा पहिला नारळ कोणत्या मंदिरात फुटतो हे बारामतीमधल्या लोकांना जाऊन विचारा. त्याचा आम्ही कधी गाजावाजा करत नाही.
दुसरीकडे माझे काही आदर्श आहेत. त्यात प्रबोधनकार ठाकरेही आहेत. प्रबोधनकारांचे लिखाण जर तुम्ही वाचले तर यासंबंधीचे सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला होईल. प्रबोधनकारांनी देव-धर्माचा बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तीविरोधात प्रचंड टीका-टिप्पणी केली.
धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्तींना ठोकून काढण्याचे काम त्यांनी केले. प्रबोधनकारांचे लिखाण आम्ही लोक वाचतो. पण सगळेच वाचतात असे नाही. बहुतेक त्यांच्याच कुटुंबातले लोक वाचत नसावेत, असे दिसते. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही.
माझे महाराष्ट्रातील जनतेला आवाहन आहे की, सांप्रदायिक विचारांची पेरणी काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. लोकांनी याला बळी पडू नये. तसेच भोंग्याबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर राज्य सरकार गंभीरतेने विचार करेल.
भाजपबद्दल कालच्या भाषणात एकही शब्द आलेला नाही. त्यांच्यावर भाजपने कदाचित काही जबाबदारी दिलेली असावी याचा प्रत्यय कालच्या सभेत आला. महागाई, बेरोजगारी एवढी वाढलेली असताना जर एखादा राजकीय नेता आपल्या सभेत त्याबाबत एकही शब्द बोलत नसेल, तर काय समजायचं? असा प्रश्न देखील शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0