PMC Contract Employees Bonus | महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर | बोनस बाबत धोरण ठरवले जाणार
PMC Diwali Bonus – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत बाह्यस्त्रोताद्वारे घेण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांना किमान वेतनामध्ये बोनस, रजा वेतन व घर भाडे लागू करणेबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्य आला आहे. स्थायी समिती आणि मुख्य सभेची मान्यता मिळाल्यानंतर बोनस देण्यावर कार्यवाही केली जाणार आहे. (PMC Standing Committee)
पुणे महानगरपालिकेत बाह्यस्त्रोताद्वारे १०२१६ कंत्राटी कामगारांची सेवा घेण्यात येते आहे. त्यापैकी १३८२ कुशल, ४६६ अर्धकुशल व ८३६८ अकुशल कंत्राटी कामगार आहेत. कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस, रजावेतन व घरभाडे भत्ता अदा करणेबाबत पुणे महानगरपालिका कामगार युनियन ( मान्यता प्राप्त ) व इतर कामगार संघटना यांनी वेळोवेळी मागणी केली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव ठेवला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
| प्रशासनाने आयुक्तांना दिला होता अभिप्राय
याबाबत प्रशासनाने आपला अभिप्राय महापालिका आयुक्त यांना सादर केला होता. त्यानुसार यापूर्वी बाह्यस्त्रोताद्वारे पुणे महानगरपालिकेच्या कामासाठी घेतलेल्या कंत्राटी कामगारांना महाराष्ट्र दुकाने व व्यापारी आस्थापना अधिनियमातील तरतुदीनुसार वेतन दिले जात होते व त्यामध्ये तरतूद असल्याने कंत्राटी कामगारांना संबंधित ठेकेदारामार्फत बोनस, रजावेतन, व घरभाडे भत्ता अदा करण्यात येत होता. २०२१ पासून कंत्राटी कामगारांना किमान वेतन अधिनियमाद्वारे वेतन देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे व किमान वेतन अधिनियमात बोनस, रजावेतन व घरभाडे भत्ता इत्यादी देण्याची तरतूद नाही. तसेच बोनस प्रदान अधिनियम १९६५, महाराष्ट्र दुकाने व व्यापारी आस्थापना अधिनियम तसेच महाराष्ट्र किमान घरभाडे अधिनियम १९८३ याधील तरतुदी पुणे मनपास (स्थानिक स्वराज संस्था) लागू नसल्याने कंत्राटी कामगारांना बोनस, रजावेतन व घरभाडे भत्ता दिला जात नाही. असे म्हटले होते. मात्र महापालिका आयुक्तांनी बोनस देण्याचा निर्णय घेतला होता.
– 45 कोटी इतका येणार खर्च
प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवलेल्या प्रस्तावा नुसार पुणे मनपामध्ये बाह्यस्त्रोताद्वारे घेण्यात येत असलेल्या कंत्राटी कामगारांना देण्यात येत असलेल्या किमान वेतनावर इतर महानगरपालिकांच्या धर्तीवर बोनस, रजा वेतन व घर भाडे यांचा समावेश करून कंत्राटी कामगारांना वेतन द्यावयाचे झाल्यास त्यासाठी पुणे महानगरपालिकेस धोरण ठरवावे लागणार आहे. ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांना वरील फायदे दिल्यास पुणे महानगरपालिकेने ६-६ महिने मुदतीसाठी थेट करारावर नेमलेल्या कंत्राटी कामगारांनाही वरील फायदे देणे क्रमप्राप्त होणार आहे. अशा कामगारांची संख्या अंदाजे ३९० इतकी आहे. बोनस, रजा वेतन व घरभाडे यांचा समावेश करून कंत्राटी कामगारांना वेतन द्यावयाचे झाल्यास वार्षिक फरकाची रक्कम ४३,३१,९८,०९२ अधिक ६-६ महिने मुदतीकरीता महापालिकेमार्फत थेट करारावर नेमलेल्या कामगारांसाठी अंदाजे वार्षिक फरकाची १,३३,८३,८७ इतकी होत आहे. याप्रमाणे एकूण ४४,६५,८१,९६५ खर्च करावा लागणार आहे. असे प्रस्तावात म्हटले आहे.
दरम्यान आता स्थायी समिती आणि मुख्य सभेची मान्यता मिळाल्यानंतर वेतनात बोनस देण्यावर कार्यवाही केली जाणार आहे.

COMMENTS