सातवा वेतन आयोग फरक रक्कम | सेवानिवृत्त सेवकांची बिले तात्काळ तपासून घ्या
| अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
पुणे महानगरपालिकेकडील सेवानिवृत्त/ मयत सेवकांचे सातवा वेतन आयोगापोटी देय असलेली फरकाची रक्कम अदा करणेकामी विवरण पत्र तपासणी करून घेण्यात आली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी याबाबत आदेश देत आठ दिवसाच्या आता हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
| असे आहेत आदेश
पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेकडील सेवानिवृत्त / मयत सेवकांचे सातवा वेतन आयोगापोटी देय असलेली फरकाची रक्कम अदा करणेकामी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेतील सर्व कार्यालये व क्षेत्रिय कार्यालयांकडील सेवानिवृत्त / मयत सेवकांचे विवरण पत्र तयार करून वेतन ऑडीट विभागामार्फत तपासून घेणे आवश्यक आहे. तथापि आमचे निदर्शनास आले आहे की बरेचसे कार्यालये व क्षेत्रिय कार्यालयांकडील सेवानिवृत्त / मयत सेवकांचे विवरण पत्र अद्यापपर्यंत तपासून घेतलेले नाही याबाबत सेवानिवृत्त सेवकांच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत आहेत. तरी पुणे महानगरपालिकेतील सर्व कार्यालयांनी सेवानिवृत्त / मयत सेवकांचे विवरण पत्र कार्यालयीन परिपत्रकाच्या दिनांकापासून पुढील आठ दिवसात वेतन-ऑडीट विभागामार्फत तपासून घेण्यात यावे.
| आगामी 4 दिवसात मिळणार फरकाची रक्कम
दरम्यान महापालिका कर्मचारी आणि अधिकारी फरकाच्या रकमेची वाट पाहत आहेत. 20 तारखेला ही रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र ती मिळालेली नाही. याबाबत संगणक विभागाला विचारणा केली असता सांगण्यात आले कि शनिवारी आणि रविवारी कर्मचाऱ्यांनी कामचुकार केल्याने हा उशीर होत आहे. जवळपास 60 बिलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्व बिलावर युद्धपातळीवर काम सुरु आहे. आगामी 4 दिवसात कर्मचाऱ्यांना ही रक्कम देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
