Governor Ramesh Bais  | रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल | मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

HomeBreaking Newsमहाराष्ट्र

Governor Ramesh Bais | रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल | मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

Ganesh Kumar Mule Feb 18, 2023 11:48 AM

Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील ९ निर्णय | जाणून घ्या सविस्तर
CM Eknath Shinde on Pune Flood | पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरीता नवीन धोरण आणण्यात येईल – मुख्यमंत्री | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी
DA Hike | राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा

रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल | मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

 

मुंबई| मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापुरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली.  बैस हे 20 वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. (Ramesh Bais 20th Governor of Maharashtra )

शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या समारंभास राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) के के तातेड, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित नागरिक उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेल्या अधिसूचनेचे वाचन केले. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली. शपथविधी सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.

 

राज्यपाल रमेश बैस यांचा परिचय

राज्यपाल रमेश बैस हे पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे.

संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्री. बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.

दिनांक 2 ऑगस्ट 1947 रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले श्री. बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले.

सन 1978 साली ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन 1980 ते 1985 या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले. सन 1982 ते 1988 या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.

सन 1989 साली श्री. बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.

सन 1998 साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात श्री. बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

सन 1999 ते 2004 या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले.

सन 2003 साली श्री. बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.

आपल्या प्रदीर्घ संसदीय जीवनात श्री. बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे.

सन 2009 ते 2014 या काळात श्री. बैस हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. सन 2014 ते 2019 या काळात 16 व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. श्री बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयकासंदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे.

सन 2019 साली श्री. बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. दिनांक 29 जुलै 2019 ते 13 जुलै 2021 या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर दिनांक 14 जुलै 2021 रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली.

नवनियुक्त राज्यपाल श्री. बैस यांना समाजसेवेची आवड असून त्यांनी अनेकदा आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. श्री. बैस यांनी छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. मध्यप्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.