Pune Water Supply | पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले २०५२ पर्यंतच्या पाण्याचे नियोजन | पाटबंधारे विभागाकडे मागितले ३४.७१ टीएमसी पाणी!

Homeadministrative

Pune Water Supply | पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले २०५२ पर्यंतच्या पाण्याचे नियोजन | पाटबंधारे विभागाकडे मागितले ३४.७१ टीएमसी पाणी!

Ganesh Kumar Mule Oct 21, 2024 9:39 AM

PMC Retired Employees Pension | गेल्या 10 दिवसांत 100 हून अधिक पेन्शन प्रकरणे मार्गी | अतिरिक्त आयुक्तांचा कारवाईचा इशारा आला कामी
PMC Pune Medical College News | पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजच्या आकृतिबंधास राज्य सरकारची मंजूरी 
PMC Pune Scholarship | १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय मार्गी लावण्याची मागणी 

Pune Water Supply | पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले २०५२ पर्यंतच्या पाण्याचे नियोजन | पाटबंधारे विभागाकडे मागितले ३४.७१ टीएमसी पाणी!

 

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील पाण्याचा प्रश्न वरचेवर बिकट होताना दिसत आहे. समाविष्ट गावांना सद्यस्थितीत पाणी कमी पडत आहे. भविष्यकाळात पाण्याची ही गरज वाढतच जाणार आहे. त्यामुळे आता महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग गंभीर झाला आहे. पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation – PMC) २०५१-५२ सालापर्यंतचे पाण्याचे नियोजन केले आहे. पाटबंधारे विभागाकडे ३४.७१ टीएमसी पाण्याची मागणी महापालिकेने नुकतीच केली आहे. यावर पाटबंधारे विभाग कसा प्रतिसाद देणार, याकडे महापालिकेचं लक्ष लागून राहिले आहे. (Pune PMC News)

पुणे शहराला विविध धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. पुणे महापालिकेला १६.३६ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. हे पाणी खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील ४ धरणे, भामा आसखेड धरण, पवना, भीमा नदी यातून घेतले जाते. मात्र पुणे शहराला वर्षाला २१ टीएमसीहून अधिक पाणी लागते. त्यातच आता समाविष्ट गावे देखील वाढली आहेत. यामुळे महापालिकेने भविष्यकाळातील पाण्याचे नियोजन केले आहे.

पुणे महापालिकेने विविध माध्यमद्वारे शहरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची माहिती गोळा केली आहे. त्यानुसार २०१९ ची लोकसंख्या ५२,०८,४४४ इतकी धरली होती. त्यामध्ये प्रतिवर्षी २०% वाढ गृहित धरून २०३१ अखेरसाठी २३.३४ टी.एम.सी. पाणी आरक्षित करून ठेवणेबाबत पाटबंधारे विभागास यापूर्वी कळविण्यात आले आहे. तसेच पुणे शहराच्या जुन्या हद्दीमध्ये ११ गावे व २३ गावे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेचे एकूण क्षेत्र सुमारे ५१६ चौ.किमी इतके झाले आहे. पुणे शहर विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी तसेच आय.टी. हब व शहरालगतची व्यावसायिक क्षेत्र इ.बाबी विचारात घेत शहराच्या लोकसंख्येमध्ये झपाटयाने वाढ होत आहे.

तसेच, नव्याने समाविष्ट गावाच्या क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात बांधकाम चालू असून त्या ठिकाणी भविष्यामध्ये येणान्य नागरिकांना पाणीपुरवठयाची मूलभूत सेवा उपलब्ध करून देणे महानगरपालिकेवर बंधनकारक आहे. पुणे मनपामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांसाठी पाणीपुरवठा योजनेच प्रकल्प अहवाल तयार करणेसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. लोकसंख्येच अंदाज बांधण्यासाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार सल्लागारांमार्फत सखोल अभ्यास करण्यात येऊन प्रचलित पद्धतीनुसार पुढील ३० वर्षांची वाढीव लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सन २०५२ मध्ये पुणे शहर व नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसाठी आवश्यक पाण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

त्यानुसार जुनी हद्द आणि समाविष्ट गावाची लोकसंख्या २०२७ साली १ कोटी ७ लाख ४ हजार इतकी होणार आहे. त्यासाठी २७.१७ टीएमसी पाणी आवश्यक आहे. तर २०५२ साली ही लोकसंख्या १ कोटी ३६ लाख ८३ हजार इतकी गृहीत धरण्यात आली आहे. त्यासाठी ३४.१७ टीएमसी पाणी आवश्यक आहे. असे महापालिकेने पाटबंधारे विभागाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

पालिकेने पुढे म्हटले आहे कि, सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांपैकी बहुतांश गावांमध्ये पाणी पुरवठ्याची कोणतीही योजमा अस्तित्वात नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना पुणे महानगरपालिके मार्फत अत्यंत अपुरा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ही गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर त्यांचे कडून पाणीपुरवठ्याबाबत वारंवार मागणी होत आहे. उपलब्ध स्त्रोतांमधूनच बावधन बु., सुस- पाणीपुरवठा योजनेची कामे पुणे म्हाळुंगे व लोहगाव-वाघोली या गावांमध्ये महानगरपालिके मार्फत सुरु करण्यात आली आहेत. उर्वरित गावांमधील नागरिक, प्रतिनिधी, मा. आमदार, मा. खासदार यांचेकडून पाणीपुरवठा योजनेची कामे करणेबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. याबाबत उच्च न्यायालय, मुंबई येथे जनहित याचिका दाखल झाली असून, त्यामध्ये उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तक्रार निवारण करणेबाबत आदेश दिले आहेत.

तसेच, अन्य काही सोसायट्या/संस्था देखील जनहित याचिका दाखल करीत आहेत. तथापि, पाणीपुरवठा योजना प्रकल्प अहवाल तयार करतेवेळी भविष्यातील सुमारे २५-३० वर्षांच्या वाढीव लोकसंख्येसाठी लागणारी पाण्याची गरज विचारात घेऊन पाण्याच्या नलिका, टाक्या, पम्पिंग यंत्रणा, इत्यादीचे नियोजन करावे लागते. त्यानुसार फक्त नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांसाठी भविष्यातील लोकसंख्या वाढ विचारात घेता सन २०३७ मध्ये ७.७५ टीएमसी व सन २०५२ मध्ये सुमारे ११.५ टीएमसी इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेकडे उपलब्ध पाणी कोटा विचारात घेता नव्याने समाविष्ट गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविणे अडचणीचे होत आहे. पुणे शहराची भविष्यातील वाढीव लोकसंख्या व नव्याने समाविष्ट गावांची लोकसंख्या विचारात घेऊन पुणे महानगरपालिकेमार्फत मुळशी धरणातून ५ टीएमसी पाणी उपलब्ध करून मिळणेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाबाबत अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही.

पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये झालेली वाढ तसेच भविष्यातील उपरोक्त नमूद लोकसंख्यावाढ विचारात घेता, पुणे शहरासाठी सन २०५१-५२ वर्षासाठी ३४.७१ टीएमसी पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. तरी स्त्रोतांमधून पुणे महानगरपालिकेसाठी सदर पाणी कसे उपलब्ध होईल याबाबतची माहिती दिल्यास उर्वरित समाविष्ट गावांसाठीची पाणीपुरवठा योजना राबविणे शक्य होणार आहे. असे महापालिकेने पाटबंधारे विभागाला सांगितले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0