Pune Road News | पुणे शहरातील रस्त्यांच्या समस्यांवर काँग्रेस आक्रमक – पथविभागाने दिले तातडीच्या कारवाईचे आश्वासन

HomeBreaking News

Pune Road News | पुणे शहरातील रस्त्यांच्या समस्यांवर काँग्रेस आक्रमक – पथविभागाने दिले तातडीच्या कारवाईचे आश्वासन

Ganesh Kumar Mule Apr 02, 2025 7:23 PM

Divyang Day | अभ्यास सहलीतून कर्णबधिर दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य! | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचा दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्तुत्य उपक्रम
Rushikesh Balgude | मनपा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कॉंग्रेसची मागणी  | पोलीस आयुक्तांना दिले निवेदन 
Annasaheb Waghire College | शिक्षकांची रिक्त पदे भरल्यानंतरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करा” | माजी कुलगुरू डॉ.आर. एस माळी यांचे प्रतिपादन

Pune Road News | पुणे शहरातील रस्त्यांच्या समस्यांवर काँग्रेस आक्रमक – पथविभागाने दिले तातडीच्या कारवाईचे आश्वासन

 

PMC Road Department – (The Karbhari News Service)  – पुणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था, मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे, अपुऱ्या दर्जाचे पॅचवर्क, ब्लॉक बसवलेल्या रस्त्यांमुळे वाढलेले अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिकेच्या पथविभाग प्रमुख अभियंता अनिरुद्ध पावसकर यांची भेट घेतली. या बैठकीत शहरातील रस्त्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. (Pune Congress)

शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्याचा वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. अपुऱ्या नियोजनामुळे रस्त्यांचे ब्लॉक घसरत असून, त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज झाकणं चुकीच्या पातळीवर बसवली गेल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, फुटपाथच्या उंची आणि लांबीतील विसंगतीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे काँग्रेस शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. (Pune Municipal Corporation Road Department)

या बैठकीत पथविभाग प्रमुख अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी काँग्रेस शिष्टमंडळाला पुणे शहरातील 54 अधिकाऱ्यांची यादी सार्वजनिक करण्याची ग्वाही दिली. तसेच, काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत स्पॉट व्हिजिट करून, शहरातील विविध ठिकाणी पाहणी करण्याचे आणि समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. यासोबतच, पुणे शहरातील रस्त्यांसाठी एकात्मिक धोरण तयार करण्यासाठी पुढील स्तरावर चर्चा करण्याची तयारीही दर्शवली.

बैठकीत पथविभागाच्या वतीने यापूर्वी राबवण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देखील देण्यात आली. काँग्रेस शिष्टमंडळाने मागणी केली की, पुणे महानगरपालिकेने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काँग्रेस अधिक तीव्र आंदोलन छेडेल.

या बैठकीत, माजी सदस्य पी एम पी एम एल चंद्रशेखर कपोते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश सदस्य प्रशांत सुरसे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाचे सरचिटणीस सुरेश कांबळे, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस चेतन आगरवाल, माजी अध्यक्ष कसबा विधानसभा काँग्रेस कमिटी प्रविण करपे, काँग्रेस पदाधिकारी माजी स्वीकृत सदस्य आयुब पठाण, राजाभाऊ कदम, काँग्रेस साजिद शेख आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर लवकरच पथविभाग आणि काँग्रेस शिष्टमंडळाच्या संयुक्त पाहणी दौऱ्याची तारीख निश्चित करण्यात येणार असून, शहरातील रस्त्यांसंबंधी सुधारणा करण्यासाठी पुढील टप्प्यात ठोस निर्णय घेतले जातील.