Pune Pustak Mahotsav | पुणे पुस्तक महोत्सव शनिवारपासून रंगणार   | लहान मुले, युवक, पुणेकर असा सर्वांना पुस्तकांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

HomeपुणेBreaking News

Pune Pustak Mahotsav | पुणे पुस्तक महोत्सव शनिवारपासून रंगणार | लहान मुले, युवक, पुणेकर असा सर्वांना पुस्तकांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

कारभारी वृत्तसेवा Dec 12, 2023 12:52 PM

PMC Pune Employees Award |  Soon distribution of meritorious workers award of the Pune municipal corporation! |  Information of Chief Labor Officer Shivaji Daundkar
Shivsena Pune | पुण्यातील पुरामुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना शिवसेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
PMC Pune Recruitment Second Phase | महापालिका भरती दुसरा टप्पा | दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी विधान भवनाचा अडसर! | रोस्टर तपासण्यात होतोय विलंब

Pune Pustak Mahotsav | पुणे पुस्तक महोत्सव शनिवारपासून रंगणार

| लहान मुले, युवक, पुणेकर असा सर्वांना पुस्तकांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

 

Pune Pustak Mahotsav | पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (National Book Trust) वतीने येत्या १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महािद्यालयाच्या (Fergusson College) मैदानावर होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवात (Pune Pustak Mahotsav) सुमारे २०० स्टॉल्स राहणार असून, पुणेकरांना १० भारतीय भाषांमधील हजारो पुस्तके पाहायला आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांना प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, पत्रकार सौरभ द्विवेदी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, लोकगीत गायक नंदेश उमप, प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांना ऐकण्याची, तर तुकाराम दर्शन महानाट्य, शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर युवकांना काश्मिरी बँड, उत्तर भारतीय संगीताचा आस्वाद घेता येणार असून, टॅलेंट हंटमध्ये दररोज आपल्या कला सादर करता येणार आहे. लहान मुलांसाठी बालसाहित्यिकांकडून कथा, गोष्टी ऐकता येणार आहे.

पुण्यात पहिल्यांदाच येत्या शनिवारपासून होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University), पुणे महापालिका (Pune Municipal Corporation), उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभाग यांनी एकत्रित केले आहे. महोत्सवासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघ (Pune Shramik Patrakar Sangh) सहआयोजक असून, भारतीय विचार साधना आणि खडकी शिक्षण संस्थेचे सहकार्य लाभले आहे. यामध्ये पुस्तक प्रदर्शनाबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, साहित्यिकांच्या मुलाखती, सृजनशिलतेला वाव देणारे आणि वाचन संस्कृतीचा विकास घडविणारे कार्यक्रम खुला रंगमंच आणि अँफी थिएटरमध्ये होणार आहेत. या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याबाबत शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी दिली आहे. पुस्तक न्यासाचे प्रकल्प अधिकारी कांचन शर्मा, एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांची उपस्थिती होती.

या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी १६ डिसेंबरला दुपारी १२ वाजता उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी, सकाळी १०.३० वाजता राजीव तांबे यांचा लहान मुलांसाठी कथाकथन हा कार्यक्रम होणार आहे. उद्घाटनाच्या सत्रानंतर दुपारी ४.३० बँडचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या दिवशी रात्री प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांचा लोकरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. या महोत्सवात दररोज दुपारी दीड ते साडेचार या वेळेत राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट हंट उपक्रमाचे आयोजन होणार आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना नृत्य, गायन, वादन अशा विविध प्रकारच्या कला सादर करता येणार आहे. या पुस्तक महोत्सवाची वेळ दररोज सकाळी १०.३० ते ८.३० अशी राहणार आहे. पुण्यातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. त्याचप्रमाणे पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.
…..
१६ डिसेंबर, शनिवारी
…..
– सकाळी १०.३० – लहान मुलांसाठी कथाकथन कार्यक्रम (खुला मंच) – सादरकर्ते – राजीव तांबे –
– दुपारी १२ वाजता – उद्घाटन सत्र
– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
– दुपारी ४.३० – बँड सादरीकरण
– सायंकाळीं ६.३० – लोकरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम – सादरकर्ते – नंदेश उमप
……..
१७ डिसेंबर, रविवारी

– सकाळी १०.३० – लहान मुलांसाठी ‘सुट्टी आली, सुट्टी आली ‘ कार्यक्रम – सादरकर्त्या – डॉ. माधवी वैद्य
– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
– सायंकाळीं ७.३० – तुकाराम दर्शन महानाट्य
…..
१८ डिसेंबर, सोमवार
– दुपारी ११.३० – प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचे व्याख्यान
– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
– दुपारी ४.३० – प्रसिद्ध पत्रकार सौरभ द्विवेदी यांच्याशी संवाद
– सायंकाळीं ५.३० – प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांचे व्याख्यान आणि गप्पा
– सायंकाळीं ७.३० – काश्मिरी बँडचे सादरीकरण
…..
१९ डिसेंबर , मंगळवारी

– सकाळी १०.३० – गाथा शिवरायांची – सादरकर्ते – मोहन शेटे (खुला मंच)
– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
– दुपारी ३.३० – स्वातंत्र्यपूर्व काळातील कारागृहात साहित्य निर्मिती करणाऱ्या ५८ स्वातंत्र्यसैनिकांवर ‘ कारागृहातील कल्लोळ ‘ हा दृक-श्राव्य कार्यक्रम ( अँफी थिएटर )
– सायंकाळीं ५.३० – हिंदुस्थानच्या फाळणीची शोकांतिका कार्यक्रमात व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची पुस्तकाचे प्रकाशन – हस्ते – सुनील आंबेकर
– सायंकाळीं ६.३० – आर्मी बँडचे सादरीकरण
– सायंकाळीं ७.३० – महाराष्ट्राची संस्कृती
……
२० डिसेंबर, बुधवारी

– सकाळी १०.३० – ओंकार काव्यदर्शन – सादरकर्ते – विसुभाऊ बापट ( आंफी थियटर)
– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
– दुपारी १. ३० – वाचणारे अधिकारी अंतर्गत आमचा वाचन कारभार कार्यक्रम – सहभाग – अविनाश धर्माधिकारी, सदानंद दाते, विश्वास पाटील
– सायंकाळीं ५.३० – ज्ञानपीठातील ज्ञानतपस्वी कार्यक्रम ( अँफी थियटर) – सहभाग – प्रसिद्ध साहित्यिक
– सायंकाळीं ७.३० – इंद्रधनुष्य – सादरकर्ते – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची चमू
…..
२१ डिसेंबर, गुरुवारी
….
– सकाळी १०.३० – व्यंगचित्रे आणि चिंटू ( अँफी थिएटर) – सादरीकरण – चारुहास पंडित
– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
– सायंकाळीं ७.३० – फैजल हा काश्मिरी गीतांचा कार्यक्रम
….
२२ डिसेंबर, शुक्रवारी

– सकाळी १०.३० – कथाकथन ( खुला मंच) – सादरकर्ते – राजीव तांबे
– दुपारी ४.३० – ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी प्रकट मुलाखत ( अँफी थिएटर) मुलाखतकार पत्रकार सागर देशपांडे
– सायंकाळीं ७.३० – श्रीमंत योगी – शिवराज्याभषेक महानाट्य -जाणता राजा सादरकर्ते महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठान
….
२३ डिसेंबर , शनिवारी

– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
– दुपारी ३.३० – राजकीय नेते काय वाचतात – सहभाग – आशिष शेलार, सतेज पाटील, डॉ. निलम गोऱ्हे, सिद्धार्थ शिरोळे
– सायंकाळीं ७.३० – मालिनी अवस्थी – उत्तर भारतीय लोकसंगीताचा कार्यक्रम
…..
२४ डिसेंबर, रविवारी

– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
– सायंकाळीं ७.३० – कलर्स बँड


‘पुणे पुस्तक महोत्सवा’त पुस्तक खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी कोथरुडकरांसाठी विशेष योजना

पुस्तक खरेदीसाठी प्रत्येक व्यक्तीला मिळणार १०० रुपयाचे एक कुपन

‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर २०२३ दरम्यान ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून, वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. पुणे पुस्तक महोत्सवात जास्तीत जास्त वाचकांनी भेट देऊन खरेदी करावी, यासाठी कोथरुड मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला १०० रुपयाचे कुपन देण्याचा निर्णय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला आहे.

 

या महोत्सवामध्ये राष्ट्रीय कीर्तीच्या प्रकाशकांबरोबरच इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराथी, कन्नड अशा देशभरातील २२ विविध भाषांमधील पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रदर्शनीचा देखील समावेश असणार आहे. त्यामुळे या पुस्तक प्रदर्शनाला जास्तीत जास्त पुणेकरांनी भेट द्यावी; यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील पुढाकार घेतला आहे.

पुणे पुस्तक महोत्सवात कोथरुडकरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पुस्तके खरेदी करण्यासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय नामदार पाटील यांनी घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत कोथरुड मधील वाचन प्रेमी मंडळींनी ‘पुणे पुस्तक महोत्सावा’स भेट देऊन प्रत्येक व्यक्तीला पुस्तक खरेदीसाठी १०० रुपयांचे डिस्काऊंट कुपन दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पुस्तके खरेदी करुन, या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

सदर पुस्तक खरेदीचे कुपन दिनांक १६ ते २२ डिसेंबर दरम्यान नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड, बाणेर मधील जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते ६ वेळेत उपलब्ध असणार आहेत. यासाठी नागरिकांना आधार कार्डची झेरॉक्स प्रत द्यावी लागणार आहे.

दरम्यान, पुण्यात होत असलेल्या अभिनव उपक्रमांमध्ये ‘शांतता, पुणेकर वाचत आहेत,’ हा ऐतिहासिक उपक्रम देखील होणार आहे. दिनांक १४ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत एक तास पुणेकरांनी आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करायचे, असे आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील हे देखील सहभागी होणार असून, सर्व पुणेकरांनी ही वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी १४ डिसेंबरच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन नामदार पाटील यांनी केले आहे.