Pune Property Tax Abhay Yojana | मागील अभय योजनेत लाभ घेतलेल्या मिळकत धारकांना देखील आता नवीन योजनेचा लाभ? | मिळकत कर विभागाचा प्रस्ताव तयार | आयुक्तांकडून अजून हिरवा कंदील नाही  

Homeadministrative

Pune Property Tax Abhay Yojana | मागील अभय योजनेत लाभ घेतलेल्या मिळकत धारकांना देखील आता नवीन योजनेचा लाभ? | मिळकत कर विभागाचा प्रस्ताव तयार | आयुक्तांकडून अजून हिरवा कंदील नाही  

Ganesh Kumar Mule Nov 27, 2025 8:17 PM

PMPML Reward Scheme | पीएमपीएमएल आपल्या प्रवाशांना देणार शंभर रुपयांचे बक्षीस | योजना जाणून घ्या सविस्तर 
District Collector | Pune | जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा
Congress | Mohan joshi | कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी  मोहन जोशी

Pune Property Tax Abhay Yojana | मागील अभय योजनेत लाभ घेतलेल्या मिळकत धारकांना देखील आता नवीन योजनेचा लाभ? | मिळकत कर विभागाचा प्रस्ताव तयार | आयुक्तांकडून अजून हिरवा कंदील नाही

 

Pune Propoerty Tax – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील आणि समाविष्ट गावातील सर्व मिळकतधारकांसाठी महत्वाची योजना आणण्यात आली आहे. करदात्यांना थकीत दंडावर  ( Penalty) विशेष सूट देण्यासाठी अभय योजना २०२५ – २६ ही  १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ कालावधीपर्यंत राबविण्यात येणार आहे. ही अभय योजनेत  थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या दंडाच्या रकमेवर ७५% सूट मिळणार आहे. या योजनेत यापूर्वी (वर्ष  २०१५-१६,२०१६-१७, २०२०-२१ व २०२१-२२) या अभय योजनेत ज्या मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे, त्या मिळकतधारकांना या अभय योजनेत लाभ दिला जाणार नाही. असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishore Ram IAS) यांनी स्पष्ट केले होते. मात्र या योजनेला तितकासा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या योजनेचा सरसकट लाभ देण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू आहेत. मिळकत कर विभागाने या बाबत प्रस्ताव तयार केला आहे. मात्र महापालिका आयुक्त यांनी याला अजून मंजुरी दिलेली नाही. यावर उद्या स्थायी समिती च्या बैठकीत चर्चा होऊ शकते, असे महापालिका सुत्रांनी सांगितले. (PMC Property Tax Department)

अभय योजना लागू झाल्यापासून महापालिकेला दररोज ६ ते ८ कोटी इतका महसूल मिळतो आहे. हा महसूल योजना नसताना देखील एवढाच मिळायचा. लोकांचा हा थंड प्रतिसाद पाहून सरसकट लाभ देण्याबाबत महापालिका सकारात्मक पाऊल उचलत आहे. तसेच सरसकट लाभ देण्याची मागणी राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी देखील केली आहे.

| एकूण थकबाकी ही १३ हजार ९७ कोटी

मिळकत कर विभागाच्या माहितीनुसार एकूण ६ लाख ३७ हजार ६०९ इतक्या लोकांनी महापालिकेचा मिळकत कर थकवला आहे. यात पुणे शहर आणि समाविष्ट गावांचा समावेश आहे.  त्यांच्याकडील एकूण थकबाकी ही १३ हजार ९७ कोटी आहे. यातील २ टक्के दंडावर ७५ टक्के सवलत दिल्यानंतर ७ हजार ९६ कोटी इतके माफ करावे लागणार आहेत. तर महापालिका ६ हजार कोटी इतकी थकबाकीची रक्कम मिळवू शकते.

| मागील योजनांचा लाभ घेतलेले १ लाख ४० हजार ४३७ मिळकत धारक

दरम्यान महापालिका प्रशासनाने ही योजना राबवताना असा निर्णय घेतला होता की, वर्ष  २०१५-१६,२०१६-१७, २०२०-२१ व २०२१-२२ या अभय योजनेत ज्या मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे, त्या मिळकतधारकांना या अभय योजनेत लाभ दिला जाणार नाही. असे एकूण १ लाख ४० हजार ४३७ लोक आहेत.

| मागील अभय योजनांचा कसा झाला फायदा

मिळकत कर विभागाच्या वतीने २०१५-१६,२०१६-१७, २०२०-२१ व २०२१-२२  या सालात अभय योजना राबवली होती. यात २०२५-१६ साली राबवलेल्या योजनेत महापालिका प्रशासनाला २२१ कोटी इतकी रक्कम मिळाली होती. एकूण थकबाकी ही १९३१ कोटी इतकी होती. त्यावेळी  एकूण २ लाख ९४ हजार ३३० इतके थकबाकीदार होते. त्यातील १ लाख ६ हजार ९०३ इतक्या लोकांनी अभय योजनेचा लाभ घेत कर भरला होता. २०१६ – १७ साली राबवलेल्या योजनेत महापालिका प्रशासनाला ३११ कोटी इतकी रक्कम मिळाली होती. त्यावेळी एकूण २ लाख ९१  हजार १७६ इतके थकबाकीदार होते. त्यातील ९० हजार ३५७ इतक्या लोकांनी अभय योजनेतील ७५ टक्के सवलतीचा लाभ घेत कर भरला होता. त्यावेळी एकूण थकबाकी २१२२ कोटी होती. २०२०-२१  साली राबवलेल्या योजनेत महापालिका प्रशासनाला ४८५ कोटी इतकी रक्कम मिळाली होती. तर थकबाकी ही २८६८ कोटी इतकी होती. त्यावेळी एकूण ४  लाख ९२  हजार १३८ इतके थकबाकीदार होते. त्यातील १ लाख ४९ हजार ६८३ इतक्या लोकांनी अभय योजनेतील ७५ टक्के सवलतीचा लाभ घेत कर भरला होता. २०२१ – २२ साली राबवलेल्या योजनेत महापालिका प्रशासनाला १४४  कोटी इतकी रक्कम मिळाली होती. त्यावेळी एकूण ३ लाख ३९  हजार २४६ इतके थकबाकीदार होते. त्यातील ६६ हजार ४५४  इतक्या लोकांनी अभय योजनेतील ७५ टक्के सवलतीचा लाभ घेत कर भरला होता. त्यावेळी थकबाकी ही २२४८ कोटी इतकी होती.
——

मागील योजनेमध्ये ज्या लोकांनी लाभ घेतला होता, त्यांना या योजनेत लाभ देण्याबाबत अजून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. यावर लवकरच चर्चा करून पुढील धोरण निश्चित केले जाईल.

नवल किशोर राम, महापालिका आयुक्त.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: